Riteish Deshmukh Talks About Genelia Deshmukh : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. हिंदीसह मराठीतही रितेशने काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. अभिनयासह दोघे निर्मिती व दिग्दर्शनातही सक्रिय असतात. येत्या काळात जिनिलीयाची निर्मिती असलेला तर रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच रितेशने आता जिनिलीयाबद्दल सांगितलं आहे.
जिनिलीया देशमुख व रितेश देशमुख यांनी यापूर्वीसुद्धा ‘वेड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. त्यांच्या मुंबई फिल्म कंपनी या निर्मिती संस्थेने यापूर्वी इतर काही मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. अशातच रितेशने नुकतीच राहुल महाजनला मुलाखत दिली असून याबद्दल सांगितलं आहे.
मुलाखतीत रितेश म्हणाला, “जर प्रादेशिक चित्रपटांना पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी आवडणारे चित्रपट बनवणं महत्त्वाचं आहे. कोविडनंतर आम्ही जेव्हा वेड चित्रपट बनवत होतो, तेव्हा आमच्याकडचे सगळे पैसे जिनिलीया आणि मी त्यात गुंतवले होते.” यावेळी रितेशला ‘तुम्ही दोघे निर्माते होतात का’ असं विचारलं.
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना रितेश म्हणाला, “जिनिलीया निर्मिती करते, मी दिग्दर्शन करतो. ती सेटवर असते. तिला सगळं माहीत असतं. दिग्दर्शक म्हणून जेव्हा मी काम करत असतो तेव्हा उद्या कोणते सीन शूट करायचे हे मी ठरवत नाही, ते ठरलेलं असतं. मला सांगितलं जातं की उद्या तुम्ही हे हे सीन शूट कराल. कोणत्या कलाकारांनी काय तारखा दिल्या आहेत वगैरे सगळं काम ती पाहते, ती खूप अप्रतिमप्रकारे काम करते.”
‘वेड’ चित्रपटाबद्दल रितेश पुढे म्हणाला, “त्यावेळी चित्रपट बनवला, पण दुर्दैवाने चित्रपटाची सॅटेलाइट आणि डिजीटल विक्री झाली नाही. स्टुडीओ नव्हता. तीन आठवड्यांआधी आम्हाला समजलं की आता आम्हालाच एकट्याने सगळं करावं लागेल, तेव्हा जिनिलीया म्हणाली आपण इथपर्यंत आलो आहोत तर आपणच डिस्ट्रीब्यूट करूयात, बघूयात काय होतंय. तो काळ खूप कठीण होता, कारण ज्याच्या आधारावर आम्ही चित्रपट बनवत होतो, ज्यातून आमचा नफा होणार होता त्याचं काही झालंच नाही. मग आम्ही आमच्याकडे होतं ते सर्व त्यात टाकलं.”
रितेश पुढे म्हणाला, “दुसरी गोष्ट आपल्याला वाटतं की जेव्हा आपण एक चित्रपट बनवत असतो, एक गोष्ट असते, तेव्हा जे काही स्टुडीओ असतात ते विश्वास ठेवतील पण त्यांचीही काही चूक नाही; कारण त्यांनी तुमचं कामच पाहिलेलं नाहीये तर ते कसा विश्वास ठेवतील, त्यामुळे आयुष्यात अनेकदा तु्म्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागतं. तुम्ही जर कोणाच्या तरी विश्वासावर राहिलात तर काहीच होणार नाही. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. वेडच्या बाबतीत तसंच झालं. जिनिलीया म्हणाली, आपण इतक्या प्रेमाने हा चित्रपट बनवलाय तर आपण तीन आठवडे त्याला प्रमोट करू, बाकी सगळं देवाच्या आणि लोकांच्या हातात आहे. तेव्हा तर हिंदी चित्रपटही चालत नव्हते. पण, आमचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ज्या प्रकारे मराठी प्रेक्षकांनी आम्हाला प्रेम दिलं, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.”
