Raja Shivaji Marathi Review : “तुमची पाठीमागून मारायची वृत्ती…मराठे ज्यादिवशी ओळखतील ती तुमच्या शेवटाची सुरुवात असेल…!”

या संवादाने सिनेमाची सुरुवात होते…अन् पुढे याचमुळे अफझल खानाचा शेवट होतो! आपण आजवर इतिहास शिकताना किंवा यापूर्वीच्या महाराजांवर आधारित ऐतिहासिक सिनेमांमध्ये खानाचा वध, सिद्दी जौहरचा वेढा, शायिस्तेखानाची स्वारी अन् मग महाराजांचा राज्याभिषेक असे बरेच टप्पे पाहिले आहेत. आता रितेश वेगळं काय सादर करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं, सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ‘राजा शिवाजी’ नावावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष सिनेमा पाहिल्यावर सहजतेने मिळून जातात.

‘राजा शिवाजी’ सिनेमात शिवरायांच्या जन्मापूर्वीची दख्खनची परिस्थिती, आदिलशहा अन् निजामाने दख्खनमध्ये घातलेला हैदोस, रयतेचे हाल…यातून झालेला माहुलीचा तह (शहाजीराजे भोसले आणि मुघल बादशाह शाहजहान यांच्यात झालेला एक महत्त्वपूर्ण तह ) याची संपूर्ण कथा टप्प्या-टप्प्यात मांडण्यात आली आहे.

१.रक्त आणि राख २.दैत्य ३.कौल नियतीचा ४.हत्तीची चाल ५.जावळी कोणाची ६.प्रलय ( खानाची स्वारी ) ७.बुद्धी बळ ८.अखेरचा डाव

अशा आठ भागांमध्ये रितेशने ‘राजा शिवाजी’ सिनेमा सादर केला आहे. लखुजीराव जाधवांची निजामाने गद्दारी करून केलेली हत्या, यानंतर माहुलीच्या तहानुसार शहाजीराजेंना पुणं सोडण्यास भाग पाडणं, पुढे बाळ शिवराय अन् माँसाहेब जिजाऊंचं पुण्याकडे प्रस्थान, शहाजीराजेंची अटक अन् सुटका तसेच यादरम्यान बाळराजे अन् शंभूराजेंमधील सुंदर नातं देखील पाहायला मिळतं. चित्रपटातील हे आठही टप्पे रितेशने कथेच्या मांडणीनुसार उत्तम सादर केले आहेत. मात्र, प्रत्यक्ष सिनेमा पाहताना अनेक ठिकाणी लढाई कृत्रिम वाटू लागते. व्हिएफएक्स, क्रोमा सीन्स प्रेक्षकांना आणखी खरे कसे वाटतील याची काळजी घेणं आवश्यक होतं. तांत्रिकदृष्ट्या या चित्रपटावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. अनेक ठिकाणी कलर ग्रेडिंगमध्येही विसंगती जाणवते…तसेच एडिटिंगमध्ये शार्पनेसचा काही प्रमाणात अभाव आहे. पण, सिनेमाच्या बँकग्राऊंड म्युझिकमुळे या सगळ्या गोष्टी झाकल्या जातात.

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं संगीत सर्वार्थाने उजवं आहे. ‘हे देवा महादेवा’, ‘माझा संभा’, ‘शंभो’ ही गाणी ऐकताच क्षणी डोळे भरून येतात. ‘छत्रपती’ हे अँथम गाणं, तसेच ‘हे शिवराय’, ‘राजा शिवछत्रपती’ ही गाणी लक्षवेधी ठरतात. सिनेमात काही विशिष्ट सीन्स आहेत…जे पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

सिनेमात बाळ शिवरायांची भूमिका रितेशचा धाकटा मुलगा राहील देशमुखने साकारली आहे. तर, रितेशचा मोठा मुलगा रियान देशमुखने सुद्धा शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा या सिनेमात साकारला आहे. सईबाई राणीसाहेबांबरोबर झालेलं लग्न, हिंदवी स्वराज्याची शपथ, प्रशिक्षणाचा कालावधी अशा विविध आणि महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये रियानने महाराजांची भूमिका साकारली आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मराठी व्हर्जन पाहताना हिंदी कलाकारांचा काही मोजक्या ठिकाणी मराठी Accent निश्चितपणे खटकतो. पण, या सगळ्यांचा अभिनय उत्तम आहे. विद्या बालनने साकारलेली कपटी ‘बडी बेगम’, संजय दत्तने साकारलेला अफझल खान आणि अमोल गुप्तेंनी साकारलेला आदिलशहा…या निगेटिव्ह शेडच्या भूमिका असल्या तरीही या तिघांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. सलमान खानचा कॅमिओ देखील जबरदस्त आहे. त्याच्या डोळ्यातील तेज, मराठी संवाद, एकंदर सलमानचा लूकच लय भारी ठरला आहे. तर, रितेश-जिनिलीयाचे सीन्स देखील अतिशय सुंदर लिहिले आहेत. “पारिजातकाचं झाड दारात असलं तरी प्राजक्त दुसऱ्याच अंगणी पडत असतं, तुम्ही आमच्यादारी हळदी पुरतेच, अंगण स्वराज्याचं!” हे संवाद शेवटपर्यंत लक्षात राहतात.

‘राजा शिवाजी’ सिनेमा सर्वार्थाने परिपूर्ण आहे असं अजिबातच नाही. असंख्य सकारात्मक गोष्टी आहेत…तर काही उणिवा देखील जाणवतात. पण, या सगळ्या पलीकडे जाऊन रितेशच्या नजरेतील महाराजांबद्दलचं प्रेम, आदर त्याची निष्ठा, त्याने घेतलेली मेहनत संपूर्ण सिनेमा पाहताना जाणवते. मराठीत पहिल्यांदाच एवढ्या लार्ज स्केलवर सिनेमा सादर करण्यात आला आहे…त्यामुळे तुम्ही सुद्धा या ऐतिहासिक पटाचा आनंद नक्कीच घेऊ शकता.