Raja Shivaji Movie Collection Day 6 : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेश गेल्या दहा वर्षांपासून मेहनत घेत होता. या सिनेमात रितेशसह अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली होती. पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला.

‘राजा शिवाजी’ सिनेमा प्रदर्शित होऊन आता सहा दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने सहाव्या दिवशी ४.२५ कोटींचा गल्ला जमावला आहे. यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन ५० कोटींच्या पार गेलं आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाचं कलेक्शन

  • शुक्रवार पहिला दिवस – १२.४० कोटी
  • शनिवार दुसरा दिवस – ११.५० कोटी
  • रविवार तिसरा दिवस – १३.१० कोटी
  • सोमवार चौथा दिवस – ५.६० कोटी
  • मंगळवार पाचवा दिवस – ४.९० कोटी
  • बुधवार सहावा दिवस – ४.२५ कोटी
  • एकूण कलेक्शन – ५१.७५ कोटी

मराठी मनोरंजन विश्वात ५० कोटींचा गल्ला जमवणारा ‘राजा शिवाजी’ हा चौथा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ सिनेमाने, २०२३ मध्ये ‘बाईपण भारी देवा’ने आणि २०२२ मध्ये रितेशच्या ‘वेड’ चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमावला होता. आता या यादीत ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक सिनेमाचं नावंही जोडलं गेलं आहे. त्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वातून रितेश आणि टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमा प्रदर्शित होऊन आता अवघे सहा दिवस उलटले आहेत. आता येत्या काही दिवसांत हा सिनेमा ‘वेड’ सिनेमाला मागे टाकेल अशा चर्चा आहेत. ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर ७३-७५ कोटी कमावले होते. ‘राजा शिवाजी’ सिनेमाला येत्या वीकेंडला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला तर ‘वेड’चा रेकॉर्ड लवकरच मोडला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून, याची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. रियान आणि राहील या दोघांनीही सिनेमात बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे.