Raja Shivaji Box Office Collection Worldwide: अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे एक महिना पूर्ण झाला आहे. १ मे रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफाट व्यावसायिक यश मिळवले आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशभरात या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. मराठी प्रेक्षकांनी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे, तर या चित्रपटाच्या फक्त मराठीच नाही तर, हिंदी व्हर्जननेही चांगली कामगिरी केली आहे. राजा शिवाजी’ चित्रपटाने हिंदी व मराठी व्हर्जनमधून आतापर्यंत किती कमाई केली आहे? ते जाणून घेऊयात.
‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये हिंदी आणि मराठी भाषेत रिलीज झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे आणि दोन्ही भाषांमध्ये बक्कळ कमाई करत आहे. अर्थात, या चित्रपटाने मराठी भाषेत जास्त चांगली कामगिरी केली असून प्रचंड गल्ला जमवला आहे. मराठीतील सर्वात मोठा चित्रपट ठरलेल्या ‘राजा शिवाजी’ची या व्हर्जनमधील एकूण (ग्रॉस) कमाई ८२.६६ कोटी रुपये आहे, तर चित्रपटाने ७०.०२ कोटी रुपयांचे निव्वळ (नेट) कलेक्शन केले आहे.
दुसरीकडे, हिंदी व्हर्जननेही प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आहे. या चित्रपटाने हिंदीत २९.७१ कोटी रुपयांची एकूण (ग्रॉस) कमाई आणि २५.१५ कोटी रुपयांचे निव्वळ (नेट) कलेक्शन केले आहे. याचबरोबर हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याचा बहुमानही या चित्रपटाने मिळवला आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने भारतात आणि जगभरात किती कमाई केली?
‘राजा शिवाजी’ची हिंदी आणि मराठी दोन्ही व्हर्जनची कमाई मिळून या चित्रपटाचे भारतातील एकूण निव्वळ (नेट) कलेक्शन ९५.१७ कोटी रुपये आणि एकूण (ग्रॉस) कमाई ११२.३८ कोटी रुपये झाली आहे. तर परदेशातून या चित्रपटाने ४.२७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन ११६.६५ कोटी रुपये झाले आहे.
राजा शिवाजी चित्रपटातील कलाकार
‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखसह अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे सलमान खानचा खास कॅमिओ आहे. सलमानची भूमिकाही प्रेक्षकांना फार आवडली असून चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, रितेश आणि जिनिलीया यांची मुलं राहिल व रियान यांनीही राजा शिवाजी सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं आहे.
