Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. सध्या रितेश-जिनिलीया दोघंही ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधताना रितेशने सिनेमातील सर्वात कठीण सीन कोणता होता याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

मी ढसाढसा रडू लागलो…

“चित्रपटात एक सीन आहे…जो छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई राणीसाहेबांमध्ये आहे. हा सीन अतिशय भावनिक आहे. त्या सीनमध्ये मला रडायचं नव्हतं…पण, ज्याप्रकारे जिनिलीया यांनी तो सीन सादर केला…मी ढसाढसा रडू लागलो. सेटवरचे सगळे लोक त्यावेळी भावुक झाले होते, सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. तो सीन, ती जागा…मला सगळं आठवतंय. सिनेमात त्या सीनला फार महत्त्व आहे. महाबळेश्वरला एका मंदिरात आम्ही तो सीन शूट केला होता. पाऊस होता, सगळीकडे धुकं होतं. हा सीन माझ्या कायम लक्षात राहणार”

जिनिलीया याबद्दल पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “माझ्यासाठी तो सीन सर्वात कठीण होता.”

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा देखील कॅमिओ असणार आहे. याशिवाय रितेशचा धाकटा लेक राहीलने या सिनेमात बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज आणि बहुआयामी कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांचा समावेश आहे.

‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.