Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Teaser : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा जबरदस्त टीझर १९ मार्चला ‘धुरंधर २’च्या स्क्रीनिंगदरम्यान थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आता हा टीझर अधिकृतरित्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा शेअर करण्यात आला आहे. १ मे २०२६ रोजी ( महाराष्ट्र दिन ) हा सिनेमा प्रदर्शित होईल. दमदार संवाद, हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती याची झलक प्रेक्षकांना या टीझरमध्ये पाहायला मिळतेय.

“आई जगदंबेचं स्मरण करून…”, रितेशची भावनिक पोस्ट

टीझर शेअर करताना रितेशने खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून रितेश या सिनेमासाठी मेहनत घेतोय. त्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. रितेश लिहितो, “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!! १० वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं..छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे. आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान! आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे. हर हर महादेव!”

संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची ‘राजा शिवाजी’ सिनेमात मांदियाळी आहे. रितेश देशमुख यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, त्याची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.

Award Banner

सिनेमात शहाजीराजे भोसलेंच्या भूमिकेत अभिनेते महेश मांजरेकर आणि राजमाता जिजाऊंची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री साकारणार आहे. याशिवाय अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाला अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. टीझरच्या शेवटी बॅकग्राऊंडला वाजणारं “छत्रपती” गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेतं. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं संगीत प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरेल. याशिवाय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.