Raja Shivaji Movie : सध्या संपूर्ण देशभरात रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकारांसह दिग्गज मराठी कलाकारही झळकणार आहेत. या सगळ्या प्रवासात कलाकारांनी देखील तेवढ्याच प्रेमाने साथ दिली असं मत रितेश देशमुखने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना व्यक्त केलं. याशिवाय जितेंद्र जोशीच्या कास्टिंगचा एक खास किस्सा त्याने सांगितला.

रितेश देशमुख म्हणाला, “मला खरंच मनापासून कौतुक करायचंय जितेंद्र जोशी यांचं. कारण, संपूर्ण सेट बांधून तयार झाला होता…शूटिंगला दोन दिवस बाकी होते आणि तेव्हा एक कलाकार आहे… त्याच्या तारखा जुळून आल्या नाहीत. काही ते कारणास्तव ते जमून आलं नाही… आणि मी अडकलो. कारण, मला नवीन सेट उभा करण्यासाठी जुना सेट पाडायचा होता. तेव्हा मला काही सुचलंच नाही, कारण ती भूमिका फार महत्त्वाची होती.”

जिनिलीया म्हणाली, जितेंद्र जोशींना विचारुयात…

“शेवटी जिनिलीया मला म्हणाली, आपण जितेंद्र जोशींना विचारुयात. माझं असं झालं…आपण इतक्या उशिरा कसं काय विचारायचं…उद्या शूटिंग आहे. जिनिलीया तेव्हा म्हणाली, ‘विचारून तर बघुयात. मी तेव्हा लगेच फोन केला आणि विचारलं… जितू कुठे आहात?’ ते समोरून म्हणाले, ‘काय झालं भाऊ? काय म्हणताय मी इथेच आहे.”
“मी त्यांना अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी फोन केला होता. मग त्यांना सगळं सांगितलं, म्हटलं मी अडकलोय…मला मदत पाहिजे. एक भूमिका आहे…फार महत्त्वाची भूमिका आहे. उद्याच शूटिंग करावं लागेल, आणि आता रात्री लूक टेस्ट वगैरे होईल. ते समोरून लगेच म्हणाले… Done!”

“त्या माणसाने एका फोनवर माझ्यासाठी इतकं करणं…ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन मी सिनेमा बनवतोय…हे त्यांचंही प्रेम आहे. याचबरोबर एवढ्या वर्षांनी हा योग जुळून आलाय…हा महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही.” अशा भावना रितेश देशमुखने व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, ‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.