Raja Shivaji Movie : रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचदरम्यान रितेशने एका खास व्यक्तीची भेट घेतली आहे. ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल अन् रितेश देशमुखची नुकतीच ग्रेटभेट झाली. मनोरंजन विश्वातील हे आघाडीचे कलाकार एकाच फ्रेममध्ये दिसले, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विकी कौशल आणि रितेश देशमुख या दोघांमध्ये भेटीदरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास, ऐतिहासिक व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि अशा भव्य चित्रपटाच्या निर्मितीमागील मेहनत याबाबत सखोल संवाद रंगला. तसेच यावेळी विकी कौशलने ‘राजा शिवाजी’च्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांचं कौतुक केलं आहे.

या चर्चेदरम्यान रितेश देशमुखने…. त्याने ‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा चार वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळल्या, याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. ऐतिहासिक विषयावर काम करताना घेतलेली मेहनत, व्यक्तिरेखांच्या मांडणीत ठेवलेली बारकाई, तसेच द्विभाषिक चित्रपटाच्या चित्रीकरणातील आव्हानं याविषयी देखील रितेशने आपलं मत मांडलं आहे. तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना एका चित्रपटासाठी एकत्र आणण्यामागील नियोजन आणि या भव्य प्रकल्पाची व्याप्ती याविषयीही रितेशने अनेक रंजक गोष्टी सांगितल्या.

या भेटीत विकी कौशलने ‘राजा शिवाजी’मधील ॲक्शन सीन्सचं विशेष कौतुक केलं आहे. विकी व्हिडीओमध्ये शेवटी म्हणतो, “मला वाटत नाही की, मराठी चित्रपटांमध्ये यापूर्वी असे ॲक्शन सीन्स पाहायला मिळाले असतील”

‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भव्य फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखे दमदार कलाकार झळकले आहेत. या संपूर्ण टीमचं नेतृत्व रितेश विलासराव देशमुख करत असून, त्याने लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.

‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन, संघर्ष, नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास यावर आधारित हा ऐतिहासिक महाचित्रपट भारताच्या गौरवशाली इतिहासाला भव्य सिनेमॅटिक रूप देण्यास सज्ज आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.