Riteish Deshmukh Raja Shivaji Trailer : संपूर्ण महाराष्ट्र ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होता, त्या ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. ट्रेलरची सुरुवात बाल शिवरायांच्या प्रश्नांनी होते, जिथे रितेशचा धाकटा मुलगा राहिल देशमुख याने बाल शिवाजी महाराजांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. “स्वराज्यासाठी काय लागतं?” या प्रश्नाला मिळालेले “विद्रोह” हे उत्तर आणि त्यानंतर रितेश देशमुखची ‘राजे’ म्हणून होणारी एन्ट्री अंगावर शहारे आणणारी आहे. अफजल खानचा वध आणि मुघलांना दिलेला इशारा यांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण ते अफजल खानचा कोथळा काढला, तेव्हापर्यंतचे अनेक प्रसंग दाखवण्यात आले आहेत. ‘राजा शिवाजी’ चित्रपटात कलाकारांची मांदियाळी आहे, अनेक कलाकारांचे दमदार लूक व संवाद यात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे चित्रपटात रितेश देशमुखचा मुलगा राहिल देशमुख याने शिवाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका केली आहे.

ट्रेलरची सुरुवात बाल शिवाजी ‘दादा, तो झेंडा कुणाचा आहे?’ असं विचारतो तिथून होते. मुघलांचा असं उत्तर मिळाल्यावर मग आपण आपल्या झेंड्याखाली का नाही लढत? असं विचारतो. ‘त्यासाठी स्वराज्य लागतं’ आणि ‘स्वराज्यासाठी काय लागतं?’ असं विचारल्यावर त्याला शंभूराजेंकडून ‘विद्रोह’ असं उत्तर मिळतं.

पाहा ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा ट्रेलर

“मगरूर मुघलांना कळू द्या, मराठे मातीत गाडले जात नाहीत, ते मातीत पेरले जातात,” या संवादाने रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत एंट्री घेतो.

“परिजातकाचं झाड दारात असलं तरी प्राजक्त दुसऱ्याच अंगणी पडतं, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे हळदीपुरतेच, अंगण स्वराज्यच”, असा संवाद सईबाईंच्या भूमिकेत असलेली जिनिलीया देशमुख म्हणते. त्यानंतर बडी बेगमच्या भूमिकेतील विद्या बालनचे संवाद आहेत. मग शंभूराजेंच्या भूमिकेतील अभिषेक बच्चनची एंट्री होते. त्यानंतर अफजल खानच्या भूमिकेतील संजय दत्तचा लूक व त्याचे दमदार संवाद ऐकायला मिळतात. एकूणच अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटात राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री आहे. त्याचबरोबर या चित्रपटात महेश मांजरेकर, फरदीन खान, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकारही आहेत. ज्योती देशपांडे आणि रितेश आणि जिनिलियाच्या मुंबई फिल्म कंपनीने सह-निर्मिती केलेला, ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.