रितेश देशमुख अलीकडे त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि मुख्य भूमिकाही साकारली होती. त्याच्याबरोबर या चित्रपटात हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार झळकले. तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाने कोट्यवधी कमावले. अशातच आता रितेशने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटसृष्टीच्या सहामाही बॉक्स ऑफिस अहवालातून अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुखसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या भव्य चित्रपटाचं दिग्दर्शनही रितेश देशमुखनेच केलं आहे. चित्रपटगृहांमध्ये दमदार यश मिळवल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे.

रितेशने पुढे २०२६ च्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनी केवळ मोठ्या बजेटच्या भव्य चित्रपटांनाच नाही, तर फाळणीवर आधारित ‘मैं वापस आऊंगा’, विनोदी ‘भूत बंगला’, ‘वेलकम टू द जंगल’ यांसारख्या विविध विषयांवरील चित्रपटांनाही भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटसृष्टीचा एक भाग म्हणून ही बाब अत्यंत आनंददायी असल्याचं सांगितलं आहे.

याबाबत बोलताना रितेश म्हणाला, “दर महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट यशस्वी होताना दिसत आहेत. एखादा विनोदी चित्रपट चालतोय, तर एखादा हॉरर चित्रपटही प्रेक्षकांची पसंती मिळवतोय. इतकंच नाही, तर काही चित्रपटांची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नसली तरी तिसऱ्या आठवड्यात ते पहिल्या आठवड्यापेक्षा अधिक चांगली कमाई करत आहेत. यामुळे सर्व चित्रपट निर्मात्यांना आशा मिळते की, विषयावर विश्वास ठेवला तर प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येतात. विषय दमदार असेल, तर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच.”

राजा शिवाजीबद्दल रितेश देशमुखची प्रतिक्रिया

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विषय संपूर्ण भारतापर्यंत पोहोचावा, हे आमचं स्वप्न होतं. त्यामुळे या चित्रपटाचा आवाका देशभर वाढला, याचा मला खूप आनंद आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादासाठी मी त्यांचा आभारी आहे. चित्रपट उभा करण्यासाठी साडेतीन वर्षे मेहनत घेतली आणि खरं सांगायचं तर हा चित्रपट बनवण्याचं स्वप्न मी दहा वर्षांहून अधिक काळ पाहत होतो.”

मराठी चित्रपटांबद्दल रितेशची प्रतिक्रिया

तो पुढे म्हणाला, “मराठी चित्रपटसृष्टीतही आज आपण ज्या प्रकारचे बॉक्स ऑफिसवरचे आकडे पाहत आहोत, ते एका नव्या पर्वाची सुरुवात असल्याचं मला वाटतं. या चित्रपटाचा विक्रम इतर अनेक चित्रपटांनी मोडावा, नवीव विक्रम करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण व्यावसायिकदृष्ट्या चित्रपटांनी जुने रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड करणं चांगली गोष्ट आहे. तरच चित्रपटसृष्टी सक्षमपणे उभी राहू शकते आणि तिची प्रगती होऊ शकते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.”