Riteish Deshmukh remembers father Vilasrao Deshmukh Death Anniversary: वडील आणि मुलाचं नातं हे शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचं असतं. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर मुलाच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते, ती वेळ कितीही पुढे गेला तरी भरून निघत नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचा मुलगा, अभिनेता रितेश देशमुख यांच्यातील नातं असंच अत्यंत जिव्हाळ्याचं होतं. रितेश अनेकदा जाहीर व्यासपीठावर, मुलाखतींमध्ये, सोशल मीडियावर आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा देत असतो. आज विलासराव देशमुख यांची १४ वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने रितेश देशमुखने एक भावुक पोस्ट केली आहे.
रितेशने वडील विलासराव देशमुख यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याचबरोबर एका ओळीचं कॅप्शन लिहिलं आणि माझा वनवास अजून संपलेला नाही, असं म्हटलंय. रितेशची ही पोस्ट पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. तसेच जिनिलीया देशमुखसह अनेक सेलिब्रिटींनीही त्याच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
रितेश देशमुखची वडिलांसाठी पोस्ट
बाबांच्या आठवणीत रितेश जेव्हा जेव्हा भावुक होतो, तेव्हा त्याच्या बोलण्यात वडिलांबद्दलचा आदर, प्रेम आणि ओढ स्पष्टपणे दिसून येते. रितेश देशमुखने पोस्टमध्ये लिहिलं,”तुम्हाला जाऊन १४ वर्षे झाली – माझा वनवास काही संपला नाही.” रितेशने असं कॅप्शन देत वडिलांबरोबरचा प्रवास करताना एक फोटो पोस्ट केला आहे.
रितेश देशमुखच्या या पोस्टवर त्याची पत्नी जिनिलीया देशमुखने तुटलेल्या हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर अदिती द्रविड व इतर काही सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक चाहत्यांनीही कमेंट्समध्ये विलासराव देशमुखांच्या आठवणी शेअर करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
रितेश देशमुख वडिलांच्या जयंती व पुण्यतिथीला नेहमी पोस्ट करत असतो आणि आपल्या भावना व्यक्त करत असतो. त्याचबरोबर त्याची पत्नी जिनिलीया देखील पोस्ट करत असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेते विलासराव देशमुख यांचे निधन १४ ऑगस्ट २०१२ रोजी झाले. त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली. अत्यंत प्रभावी वक्तृत्व, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि प्रशासनावरील पकड यासाठी ते ओळखले जायचे.
