scorecardresearch

जिनिलीयाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठ्याने हाक मारली अन्…

सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणी आणि त्यांच्याशी असलेल्या बॉन्डिंगबद्दल सांगताना जिनिलीया देशमुख झाली भावूक

जिनिलीयाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठ्याने हाक मारली अन्…
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता रितेश देशमुख सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. नुकताच त्याची आणि जिनिलीया देशमुखची मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही रितेशनं केलं होतं आणि या चित्रपटात रितेश जिनिलीयाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि सर्व प्रश्नाची उत्तरं तर दिलीच पण याबरोबरच काही धम्माल किस्सेही शेअर केले. रितेश देशमुखने यावेळी जिनिलीया देशमुख आणि त्याचे वडील दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात घडलेला एक किस्सा शेअर केला.

आणखी वाचा-…म्हणून रितेश देशमुख मराठी चित्रपटांत लावतो वडिलांचं नाव, कारणही आहे खास

जिनिलीया आणि रितेश लग्नाआधी १० वर्षे एकमेकांचे चांगेल मित्र होते. त्यामुळे तिचं रितेशच्या घरी जाणं-येणं असायचं. जेव्हा मुलाखतीत सासरे विलासराव देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांच्या आठवणी आणि त्यांच्याशी असलेल्या बॉन्डिंगबद्दल सांगताना जिनिलीया देशमुख खूपच भावूक झाली होती. त्यानंतर रितेशने जिनिलीयाचा एक किस्सा सांगितला.

रितेश म्हणाला, “बाबा मुख्यमंत्री असताना एकदा जिनिलीया घरी आली होती आणि आम्ही दोघं ‘वर्षा’च्या मागच्या बाजूला एक गार्डन आहे तिथे बसलो होतो. तेवढ्यात बाबा ऑफिसमधलं काम संपवून तिथल्या कॉरिडॉरमधून ते जात होते. तर जिनिलीयाने त्यांना जोरात हाक मारली, ‘हाय अंकल’ हे ऐकल्यानंतर मी दचकलो की, आता इथे हिचे कोणते अंकल आले. समोर पाहिलं तर बाबा तिथून जात होते आणि तेही तिला हात हलवून हाय, हॅलो करत होते. मी मनात म्हणालो एवढ्या वर्षात बाबांना अशाप्रकारे हाक मारायची आमची हिंमत नाही झाली आणि ही मात्र बिनधास्त हाक मारत होती. पण त्या दोघांमध्ये मुलगी आणि बाबांचं नातं होतं.”

आणखी वाचा- “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

रितेश व जिनिलीयाने ‘वेड’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ३० डिसेंबरला त्यांचा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशोक सराफ, शुभांकर तावडे हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिनिलीयाने केली आहे तर दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 17:51 IST

संबंधित बातम्या