रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा मराठीमधील दुसरा चित्रपट. या चित्रपटाच्या संवादाचं लेखन लेखक प्राजक्त देशमुखने केलं. त्याच्याचबाबती आता एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई-नाशिक हायवेवर प्रवास करताना प्राजक्तच्या गाडीला अपघात झाला. हिच घटना व अपघाताचा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
नेमकं काय घडलं?
प्राजक्त मुंबई-नाशिक हायवेवर पोहोचला. क्षणार्धात नेमकं काय घडलं? हे त्यालाही कळलं नाही. पण नंतर सगळा प्रकार जेव्हा कळला तेव्हा प्राजक्तने त्याच्या गाडीची कशी अवस्था झाली आणि नेमका हा अपघात कसा घडला? हे सांगितलं. प्राजक्त ट्वीट करत म्हणाला, “नाशिक मुंबई हायवेवरुन धावणारी अवजड वाहने बेशिस्तीने चालतात. भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेंटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला.”
“थोडक्यात बचावलो. मी सुखरुप आहे. परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लावून दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम” असं म्हणत प्राजक्तने त्याचा संताप व्यक्त केला आहे. पुढे तो म्हणाला, “ट्रकने ब्लॅाक उडवला म्हणजेच तो उजवीकडून चालत होता.”
“अवजड वाहन हायवेला डावीकडून चालणं अपेक्षित असताना अत्यंत बेजबाबदारपणे हे घडलं. शिवाय ट्रकवाला न थांबता पळून गेला. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाशिक-मुंबई हायवेवर जीव मुठीत धरुन गाड्या चालवा.” प्राजक्तचा काळ आला होता पण वेळ नाही असंच हा व्हिडीओ पाहून म्हणावं लागेल.