Riteish Deshmukh Family Trip : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर भरभरून यश मिळालं. जगभरात १२० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपट हा रितेशसाठी ड्रीम प्रोजेक्ट होता. गेल्या दहा वर्षांपासून तो या प्रोजेक्टसाठी मेहनत घेत होता. याशिवाय ‘राजा शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर रितेशने प्रमोशनसाठी अनेक शहरांमध्ये भेट दिली. एकंदर काय तर गेले काही महिने तो पूर्णपणे व्यग्र होता. त्यामुळे आता सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाल्यावर, चित्रपटाला चांगलं यश मिळाल्यावर रितेश आपल्या कुटुंबीयांसह फॅमिली ट्रिपला गेला आहे.

या ट्रिपचं आणखी एक खास कारण होतं ते म्हणजे त्याच्या लाडक्या लेकाचा दहावा वाढदिवस. रितेशला रियान अन् राहील अशी दोन मुलं आहेत. यापैकी त्याचा धाकटा मुलगा राहीलचा १ जूनला दहावा वाढदिवस होता. लेकाच्या १० व्या वाढदिवसानिमित्त रितेश अन् कुटुंबीय खास मालदीवला पोहोचले आहेत.

Riteish Deshmukh Family Trip
रितेश देशमुख व कुटुंबीयांची मालदीव ट्रिप

निळाशार समुद्र, वॉटर व्हिला अशा निसर्गरम्य वातावरणात राहीलने त्याचा वाढदिवस साजरा केला. याचे खास फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सर्वात आधी त्यांच्या फॅमिली ट्रिपची झलक जिनिलीयाने शेअर केली होती. तिने एअरपोर्टवरचा तिच्या दोन्ही मुलांचा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर रितेशने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये मालदीवचे वॉटर व्हिला आणि राहीलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पाहायला मिळाले.

Riteish Deshmukh Family Trip
रितेशच्या लेकाचा १० वा वाढदिवस

याशिवाय रितेशने आपल्या लाडक्या लेकासाठी खास पोस्ट देखील शेअर केली होती. अभिनेता म्हणतो, “रायो…आय लव्ह यू! तू खरंच खूप हुशार आणि आमचा Incredible Boy आहेस. तू आता हळुहळू मोठा होत आहेस पण मला आशा आहे की, तुझ्यातलं बालपण, तुझी मोहकता तू सदैव जपशील. My Son…तुला १० व्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या माध्यमातून रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांनी इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. याशिवाय या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त, अमोल गुप्ते, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी असे दिग्गज कलाकार झळकले आहेत.