मराठी रंगभूमीवर मायलेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेने मांडणाऱ्या ‘चारचौघी’ या गाजलेल्या नाटकातून रसिकांचे मन जिंकणाऱ्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. या वेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ‘माया’मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे. रोहिणी हट्टंगडी म्हणतात, ‘‘मुक्ताबरोबर पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्याबरोबर काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते.

अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्याबरोबरचे प्रत्येक दृश्य मला समृद्ध करून जाते’’. तर रोहिणी हट्टंगडी यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना, ‘‘त्यांच्याबरोबर पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते. सेटवर त्यांच्याबरोबर असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे,’’ अशी भावना मुक्ताने व्यक्त केली.

शालिनी सिनेमाज् आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.