Ruchira Jadhav Kokan Balya Dance Video Chiplun: मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार हे कोकणातील असून गणेशोत्सव व शिमग्यासाठी ते गावाकडे जात असतात. आता मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव कोकणामध्ये गेली असून तिथे उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. रुचिराने तिच्या चिपळूणमधील घराच्या अंगणामध्ये कोकणाची खास परंपरा असलेला बाल्या नृत्य प्रकार केला असून तिचा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अनेक कलाकार हे कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा करत आहेत. आता रुचिरा जाधवही यामध्ये सहभागी झाली असून तिने घरातील अंगणामध्ये बाल्या डान्स केला. या नृत्य प्रकाराला जाखडी नृत्य किंवा शक्ती-तुरा असेही म्हणतात. सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग असलेल्या “जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले” या गाण्यावर रुचिरा थिरकली असून तिने कोकणातील मुलींबरोबर हा डान्स केला. गोलाकार पद्धतीने पारंपरिक स्टेप्स करत ती उत्साहाने यामध्ये सहभागी झाली असून तिचा उत्साह पाहून चाहत्यांनी कौतुक केले.

गणेशोत्सव, कोकण अन् बाल्या डान्स

कोकणातील खास गणेशोत्सवाचा क्षण शेअर करत रुचिराने लिहिले, “गणेशोत्सव, कोकण आणि बाल्या डान्स होणार नाही…. ? या आमच्या गावच्या सुकन्यांना माझ्याबरोबर डान्स करायचाच होता आणि मीही त्यांना नाही म्हणू शकले नाही. हा तर फक्त एक व्हिडीओ आहे, जसे अजून व्हिडीओ आहेत.”

बाप्पामुळे गजबजलेलं घर, हिरवागार निसर्ग अन् आईची मंगळागौर

याचबरोबर आणखी एक पोस्ट करून रुचिराने कोकणातील गणेशोत्सव तिच्यासाठी खास असल्याचे सांगितले. तिने लिहिले, “मला माझ्या मूळ गावी चिपळूणला परत जाता येत असल्याने, हा माझा वर्षातील सर्वात आवडता काळ आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे उकडीच्या मोदकावर केशराची किनार आणि साजूक तुपाची धार…दरवर्षी बाप्पाच्या निमित्ताने का होईना, एक-दोन दिवस तरी कोकणात जातेच. मागच्या वर्षी वन-डे रिटर्न ट्रिप केली होती, पण यावर्षी दोन दिवस मनसोक्त राहता आले. भावंडे, कुटुंब, बाप्पामुळे गजबजलेलं घर, हिरवागार निसर्ग, आईची मंगळागौर आणि फुगड्या, बाबांनी गावची परंपरा जपत केलेला बाल्या डान्स आणि सगळ्यांच्या हसण्यात विरघळून गेलेले क्षण…अजून काय पाहिजे..?”