Rutuja Bagwe : सोशल मीडियावर विविध प्रकारचे ट्रेंड येत असतात. कधी खास क्षणांचे फोटो तर कधी महिन्याभराचे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड येत असतो. सध्या इन्स्टाग्रामवर एक वेगळच ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये लहानपणीचा फोटो शेअर करत तेव्हाची मी आणि आताची मी असे कॅप्शन लिहिले जात आहे. या ट्रेंडमध्ये अनेक कलाकारदेखील सहभागी होत आहेत. यामधून लहानपणींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. सोशल मीडियाच्या या ट्रेंडमुळे चाहत्यांना त्यांचे कलाकार हे लहानपणी कसे दिसत होते याची झलक पाहायला मिळत आहे.

अनेक कलाकरांनी या ट्रेंडमध्ये सहभाग घेत त्यांचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये चाहत्यांना हा नक्की त्यांचाच फोटो आहे का हे ओळखणेही अवघड झाले आहे. कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहून चाहते आनंद व्यक्त करीत आहेत. यामध्ये आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हीदेखील सहभागी झाली आहे. तिने सोशल मीडियावर तिचा लहानपणीचा फोटो शेअर केला असून यामध्ये तिला ओळखणेही अवघड झाले आहे.

ऋतुजा बागवेने शेअर केला खास फोटो

इन्स्टाग्रामवर ऋतुजा बागवे हिने एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋतुजा अगदी गोंडस दिसत असून तिचा लहानपणी शॉर्ट हेअर कट असल्याचे दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि बोलके डोळे यामुळे चाहत्यांना तिचा हा फोटो पसंतीस उतरला आहे. लहानपणीची मी आणि आताची मी अशा आशयाच्या कॅप्शनसह तिने हा फोटो शेअर केला आहे. यासह तिने आताचा अगदी त्याच पोझमध्ये फोटो शेअर केला आहे. ऋतुजाने या स्टोरीला २०१० मधील ‘इश्किया’ चित्रपटातील ‘दिल तो बच्चा है जी’ गाणं लावलं आहे.

ऋतुजा बागवे इन्स्टाग्राम स्टोरी

ऋतुजा बागवे ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. काही वर्षांपूर्वी तिने केलेल्या ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील भूमिकेने तिला घराघरांत ओळख मिळवून दिली. तिचे ‘अनन्या’ हे नाटकही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याचबरोबर तिने ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अंधारमाया’ सीरिजमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

ऋतुजाचे ‘फूडचं पाऊल’ हॉटेल

मनोरंजनविश्वासह ऋतुजा बागवे ही एक बिझनेसवुमनही आहे. तिचे ‘फूडचं पाऊल’ नावाचे हॉटेल असून तिने काही दिवसांपूर्वी हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. मरोळ येथे तिचे हे हॉटेल असून अनेक मराठी कलाकारांनी तिच्या हॉटेलला भेट दिली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी ऋतुजा अनेकदा तिच्या हॉटेलची झलक शेअर करत असते.