Sachin Pilgaonkar Response To Trolling : सोशल मीडियावरील ट्रोलिंग हे आता काही नवीन राहिलेलं नाही. अनेकांना या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यात कलाकार मंडळी तर त्यांच्या विविध वक्तव्यांनी कायमच ट्रोल होत असतात. सोशल मीडियावर कुठल्याही मुद्द्यावरून ट्रोलिंग सुरू होतं. त्यात सॉफ्ट टार्गेट बनतात ती कलाकार मंडळी.

गेल्या काही दिवसांत अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर त्यांच्या विविध वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. मुलाखतींमधील वक्तव्यावरून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सहन करावी लागली आहे. त्यांच्या या ट्रोलिंगवर इतर मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत स्वत: सचिन पिळगांवकरांनी सोशल मीडियावर ट्रोलिंगला उत्तर दिलं आहे.

सचिन पिळगावकर यांची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया

रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ट्रोलिंगवर सचिन पिळगांवकर म्हणाले, “ट्रोलर्सपेक्षा प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या प्रेम करणाऱ्यांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा काळजी करण्याचं कारण असेल. शाहरुख खानच्या आयुष्यात असाच एक काळ आला होता. त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. तेव्हा त्याला एकाने ट्रोलिंगमुळे त्रास नाही होत का? असं विचारलं होतं. त्यावर तो म्हणालेला, ‘ज्या माणसाने आयुष्यात कधीच काहीच केलं नाहीये आणि आपण खूप मोठं काम केलं आहे, असं मानून तो माणूस ट्रोल करून रात्री शांत झोपत असेल तर त्याच्या शांत झोपेचं कारण मी आहे, याचा मला आनंद आहे’.”

६३ व्या वर्षी इतका महत्त्वाचा वाटत असेल तर…

यापुढे ते म्हणाले, “ट्रोलर्स कदाचित ट्रोलिंग करून पैसे कमावत असतील, तर कमावू दे. येत्या ३१ डिसेंबरला माझ्या करिअरची ६२ वर्ष पूर्ण होणार आहेत; तर करिअरच्या ६३ व्या वर्षी या लोकांना मी इतका महत्त्वाचा वाटत असेल तर याहून मला जास्त काय पाहिजे? कुठल्या कलाकाराला ६३ व्या वर्षी इतकं महत्त्व दिलं गेलंय.”

सोशल मीडियावर इतका लोकप्रिय आहे की…

शेवटी ते म्हणाले, “सोशल मीडियावर आता मी इतका लोकप्रिय आहे की, त्यामुळे मला आता खूप जाहिराती मिळतायत. तर ठीके ना… हा पण बदल आहे. यातली नकारात्मकता आपण बाजूला ठेवू किंवा आपण ते सुधारू शकत नाही. हे काम करणारी जी मुलं आहेत, त्यांना मी भरभरून आशीर्वाद देतो. काही मुलांना वाटतं की मी त्यांच्या वयाचा आहे, त्यांना माहीत नाही की मी ६३ वर्षे या इंडस्ट्रीत आहे. पण, या मुलांचं आयुष्यात भलं व्हावं, त्यांचं नाव व्हावं हा माझा त्यांना आशीर्वाद आहे.”