Sachin Pilgaonkar singing Geet Gaata Chal song in viral video: सचिन पिळगांवकर हे प्रामुख्याने मराठी सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही काम केले. विनोदी, गंभीर, रोमँटिक, अॅक्शन अशा विविध धाटणीच्या भूमिका त्यांनी साकारल्या. आजही ते विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मराठी सिनेसृष्टीत सचिन पिळगांवकर यांचे योगदान महत्वाचे आहे.
मराठी चित्रपटांबरोबर त्यांनी हिंदी सिनेमांतही काम केले आहे. सत्ते पे सत्ता, बालिका वधू, ऐसी भी क्या जल्दी है, पिया मिलन, गीत गाता चल, नदिया के पार अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. आता सचिन पिळगांवकर चर्चेत आले आहेत. त्यांनी एक गाणे गायले आहे.
सचिन पिळगांवकरांनी गायले गाणे
सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर एक गाणे गात आहेत. ‘गीत गाता चल’ चित्रपटातील ‘गीत गाता चल ओ साथी’ हे गाणे गात आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना श्रिया पिळगांवकरने लिहिले, “जेव्हा मी माझ्या वडिलांबरोबर प्रवास करते, तेव्हा आपण एखाद्या ठिकाणाचं जे सौंदर्य अनुभवतो, ते त्यांच्या गाण्यांतून सुंदरपणे व्यक्त होते. हे मला खूप आवडते.”
पुढे तिने लिहिले की ‘गीत गाता चल .. साथी गुनगुनाता चल’ हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या एका हिंदी चित्रपटातील आहे.
चाहत्यांसह कलाकारांनी केला कौतुकाचा वर्षाव
श्रियाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. फक्त चाहतेच नाही तर कलाकारांनीदेखील त्यांचे कौतुक केले आहे. निवेदिता सराप, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडेकर, फुलवा खामकर, स्वप्नील जोशी अशा अनेक कलाकारांनी सचिन पिळगांवकर यांचे कौतुक केले आहे.



एका चाहत्याने लिहिले, “मला हा सिनेमा खूप आवडला”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “गीत गाता चल हा माझा आवडता चित्रपट आहे. मी लहान असताना हे गाणे गुणगुणत असे”, आणखी एकाने लिहिले, “खूप छान. त्यांनी असे व्हिडीओ बनवले पाहिजेत”, एकाने लिहिले, “किती सुंदर आवाज आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही सर्वगुणसंपन्न आहात”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी सचिन पिळगांवकर यांचे कौतुक केले आहे.

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. ती विविध ठिकाणी फिरायला जाते. तेथील व्हिडीओ, फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. याबरोबरच, ती तिच्या कामाबद्दलही चाहत्यांना याद्वारे माहिती देत असते. तिच्या डान्सचे व्हिडीओदेखील ती शेअर करते. अनेकदा ती आई-वडिलांबरोबरचे फोटोदेखील शेअर करते.
श्रियाने विविध वेब सीरिज, चित्रपटांतून तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती लवकरच हैवान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
