काही कलाकार हे प्रेक्षकांसाठी कायम खास असतात. अभिनेते सचिन पिळगांवकर त्यापैकी एक आहेत. अनेक चित्रपटांत अभिनय करत, वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत, तर कधी चित्रपटांचे दिग्दर्शन करत सचिन पिळगांवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळते. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांची आणि दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांची मैत्री कशी झाली, याबद्दल वक्तव्य केले आहे.
“मी माझ्या आयुष्यात कोणत्याच कलाकाराचा ऑटोग्राफ घेतला नाही”
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच ‘जस्ट नील थिंग्ज’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से, आठवणी सांगितल्या आहेत. मुलाखतीदरम्यान संजीव कुमार आणि त्यांच्या मैत्रीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपट त्यांनी पाहिला होता, त्यांना तो हिंदीमध्ये बनवायचा होता, त्यामुळे आमची मैत्री झाली. मी थोडा मोठा झाल्यानंतर त्यांनी हा चित्रपट पाहिला होता, त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो. त्या चित्रपटातील माझा दारू प्यायलेला सीन पाहिला आणि ते लगेच घरी आले. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्याकडे ऑटोग्राफ बुक आणि पेन होता. त्यांनी मला ऑटोग्राफ देशील का? असे विचारले. त्यांनी मला म्हटले होते, “मी माझ्या आयुष्यात कोणत्याच कलाकाराचा ऑटोग्राफ घेतला नाही. हा पहिला ऑटोग्राफ असेल आणि मला सांग तो सीन तू कसा केलास?” अशी आठवण सचिन पिळगांवकरांनी सांगितली आहे.
याबरोबरच, ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट बनवतानाचे किस्से, मोहम्मद रफी यांच्याबद्दलच्या आठवणी, अशोक सराफ, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीदेखील त्यांनी या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत.
हेही वाचा: “रफीसाहेबांकडे कायम एकच तक्रार असायची…”, सचिन पिळगांवकरांनी सांगितली मोहम्मद रफी यांच्याबद्दलची आठवण
‘बचपन’ चित्रपटात संजीव कुमार यांच्यासाठी मोहम्मद रफी गाणार होते, त्यावेळी पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.
दरम्यान, सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात गाजला होता. आता त्याचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, हेमल, अशोक सराफ, निर्मिती सावंत, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव आणि इतर कलाकार दिसणार आहेत. आता पहिल्या भागाइतकाच या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.