सचिन पिळगांवकर(Sachin Pilgaonkar) हे अभिनय, दिग्दर्शनाच्या माध्यमातून विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मोहम्मद रफी यांच्याबद्दलची आठवण सांगितली आहे.
“रफीसाहेबांकडे कायम एकच तक्रार असायची…”
अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच ‘जस्ट नील थिंग्ज’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से, आठवणी सांगितल्या आहेत. मोहम्मद रफी आणि तुमची मैत्री कशी होती, त्याबद्दल सांगा, यावर बोलताना ते म्हणाले, “रफीसाहेब माझ्या एका चित्रपटाचे गाणे गात होते, त्यावेळी त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. अर्थात, ते माझ्याकरिता गाणं गात नव्हते. कारण- मी लहान होतो. ‘बचपन’ नावाचा चित्रपट होता; ज्यामध्ये संजीव कुमार होते. हा चित्रपट टॉम सॉयर नावाच्या एका गोष्टीवर होता. त्यातील मुख्य पात्र मी साकारत होतो. तर संजीव कुमारवर ‘आया रे खेल खिलौने वाला खेल खिलौने लेके आया रे’ गाणं रेकॉर्ड होणार होतं. त्यावेळी मी पहिल्यादा रफीसाहेबांना भेटलो. त्यावेळी मी त्यांना नमस्कार करण्याआधी त्यांचा सलाम करण्यासाठी हात वरती गेला. आमची रफीसाहेबांकडे कायम एकच तक्रार असायची. आम्ही त्यांना म्हणायचो, ‘आम्हाला कधीतरी पहिल्यांदा सलाम करू द्या.’ पण, कधी संधीच नाही दिली त्यांनी. कोणीही असो कायम पहिल्यांदा त्यांचा हात वरती जायचा. असा माणूस होता तो.
पुढे सांगताना त्यांनी म्हटले, “आपल्याशी बोलताना ते कायम हळू आवाजात बोलायचे. कान देऊन ऐकायला लागायचं, ते काय म्हणतात ते. पण, माईकवर उभं राहिल्यानंतर त्यांचा जो आवाज होता, तो ऐकल्यानंतर माणूस हलायचा, असा त्यांचा आवाज होता.
“मी मंत्रमुग्ध झालो…”
” ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’ असे माझे दोन-चार चित्रपट लोकप्रिय ठरले होते. नवीन नवीन नाव होतं. त्यामुळे हे लोक मोठ्या मोठ्या माणसांच्या कार्यक्रमांना नवीन लोकांना बोलवायचे. तर तसा मला फोन आला की, असा असा रफीसाहेबांचा शो होणार आहे. कोलकात्यापासून अडीच तासांच्या अंतरावर. तर तुम्ही येणार का? रफीसाहेबांना समोर ऐकायला मिळणार म्हणून मी हो म्हटले. ठरलेल्या ठिकाणी गेलो. माझ्या रूमकडे जात असताना मला एका खोलीतून हार्मोनियमचा आवाज आला. कोण आहे हे पाहण्यासाठी मी गेलो. हळूच दरवाजा उघडला, तर रफीसाहेब कार्पेटवर एकटे हार्मोनियम वाजवत होते. मी मंत्रमुग्ध झालो. त्यांनी मला पाहिले आणि आत येण्यास सांगितलं. मी त्यांना विचारलं की, रात्री शो आहे; तर आता आराम करणार नाही का, झोपणार नाही? तर ते मला म्हणाले, जेव्हा रात्री गायचे असते तेव्हा त्याआधी झोपायचे नाही. आवाज जड होतो. ती एक गोष्ट डोक्यात राहिली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही काय ऐकणार? मी त्यांना म्हटलं की, तुम्ही जे ऐकवणार ते ऐकतो. पुढचे तीन तास मी त्यांना ऐकले. कोणाचं नशीब असेल?”
“रफीसाहेबांकडून ‘कांच और हीरा’ चित्रपटातील गाणं ऐकलं आणि मी हललो”
पुढे सचिन पिळगांवकरांनी म्हटले, “रफीसाहेबांची काही गाणी चित्रपट न चालल्यामुळे हिट नाही झाली. अशी अनेक गाणी आहेत, जी त्यांनी सुंदर गायली आहेत. ‘कांच और हीरा’ चित्रपटातील गाणं होतं. त्यातील रफीसाहेबांचं गाणं होतं. मी त्यांना विचारलं की, ते गाणं आहे तुमच्याजवळ? ते म्हणाले, हो आहे. मी म्हटलं की, ऐकवा ना ते गाणं मला खूप आवडतं. त्यावर ते म्हणाले, तुम्हाला आवडतं? लोक हे गाणं म्हणण्याची फर्माईश नाही करत आणि त्या माणसानं मला ते गाणं ऐकवलं. काय गायलं होतं, मी हललो ते गाणं ऐकल्यानंतर.” अशी आठवण सचिन पिळगावकरांनी या पॉडकास्टमध्ये सांगितली आहे.
दरम्यान, सचिन पिळगांवकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा-२ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.