Sachin Pilgaonkar shares special post for Supriya Pilgaonkar: सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. या जोडप्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी अनेक सिनेमांत विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातपुते’, ‘माझा पती करोडपती’ अशा सिनेमांत त्यांनी एकत्र काम केले आहे.
त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. त्यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी १९८५ मध्ये लग्न केले. सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर हे वेळोवेळी एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करतात, प्रेम व्यक्त करतात. दोन्ही कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
सचिन पिळगांवकरांची सुप्रिया पिळगांवकरांसाठी खास पोस्ट
सोशल मीडियावर ते त्यांच्या ट्रिपचे फोटो, व्हिडीओ शेअर करतात. एकमेकांबरोबर, तसेच कुटुंबाबरोबर घालवलेले काही खास क्षणही साजरे करतानाचे व्हिडीओ ते शेअर करतात; तर काही वेळा ते मनोरंजन क्षेत्रातील त्यांचे मित्र, सहकलाकार यांच्याबरोबरचे व्हिडीओ, फोटो शेअर करीत असतात. अगदी ते एकमेकांबद्दलही मोकळेपणाने व्यक्त होतात.
आता सुप्रिया पिळगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन पिळगांवकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये काही व्हिडीओ, तर काही फोटो आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये सचिन पिळगांवकर सुप्रिया यांच्यासाठी गाणे गात असल्याचे पाहायला मिळत आहे. ते ‘ऐ मेरी जोहरा जबी…’हे गाणे म्हणत असल्याचे दिसत आहे; तर सुप्रिया पिळगांवकर त्यावर अभिनय करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांचे विविध ठिकाणचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये त्यांचा एक जुना फोटोही पाहायला मिळत आहे.
हे व्हिडीओ व फोटो शेअर करताना सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन तुझा जोडीदार होता आलं, हे माझं भाग्य आहे. सुपर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी या जगात येण्यासाठी थँक्यू.” पुढे त्यांनी सुप्रिया पिळगांवकरांना टॅग करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सचिन पिळगांवकर यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. सुप्रिया पिळगांवकर यांना टॅग करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला आहे. त्यामध्ये अनेक कलाकारांचाही समावेश आहे.
दरम्यान, सचिन पिळगांवकर यांनी अभिनयाबरोबर निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले आहे. आता त्यांची मुलगी श्रिया पिळगांवकरही मनोरंजन क्षेत्रात उत्तम काम करीत असल्याचे पाहायला मिळते.
