Sachin Pilgaonkar : मराठीसह बॉलीवूड मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाचा, दिग्दर्शनाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून सचिन पिळगांवकर यांना ओळखलं जातं. आज जवळपास ६३ वर्षे ते या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच वैभव मुंजालच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. आयुष्यात अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. पण, आयुष्यात आलेल्या अशा काही घटना प्रत्येकाला खूप काही शिकवून जातात. याबद्दल बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले, “माझ्या आयुष्यातील फेव्हरेट Failure बद्दल सांगायचं झालं तर, मी माझ्या मुलीबरोबर बनवलेला हा पहिला चित्रपट. श्रियाने त्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती, ‘एकुलती एक’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे. तो सिनेमा अजिबात चालला नाही.”
अभिनेते पुढे म्हणाले, “पण, तरीही तो चित्रपट माझ्यासाठी खूप जवळचा आहे. त्याला मी फेव्हरेट Failure म्हणू शकतो. श्रियाचा तो पहिला सिनेमा होता आणि मी सुद्धा तिच्याबरोबर त्या पहिल्याच सिनेमात स्क्रीन शेअर केली होती…हे एकमेव कारण यामागे नाहीये. मनापासून सांगतो, तो चित्रपट खूप छान होता. अतिशय संवेदनशील विषय होता…पण, माझ्याकडूनच कदाचित काही गोष्टी कमी पडल्या असतील. चित्रपट छान होता पण, बेस्ट नव्हता. यामुळे बऱ्याच गोष्टी शिकता आल्या…. म्हणून मी त्या चित्रपटाला फेव्हरेट Failure म्हणेन.”
“आपल्या आयुष्यात आलेलं अपयश आपण स्वीकारलं पाहिजे आणि आपण त्यातून काय शिकू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येकजण चुका करतो..चुका माणसाकडूनच होतात. पण, त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आजवर मी ज्या-ज्या निर्मात्यांबरोबर काम केलंय…कधीच कोणाचं नुकसान झालेलं नाहीये. ही देवाची कृपा आहे. कारण, नेहमी निर्मात्याला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनवावा. मी दोन व्यक्तींकडून आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट शिकलो, ते दोघं म्हणजे मनोज कुमार आणि मनमोहन देसाई ( निर्माते-दिग्दर्शक ). या दोघांचं कायम म्हणणं असायचं की, ५० रुपये खर्च करा आणि जगाला १०० रुपये खर्च केल्याप्रमाणे दाखवा. पण, काही लोक शंभर रुपये खर्च करतात आणि २५ रुपये देखील दिसत नाहीत. याला फिल्म मेकिंग म्हणत नाहीये. जेणेकरून निर्मात्याचंही नुकसान होणार नाही.” असं मत सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केलं.
