ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होत असतात. त्यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या टीकेबद्दल आता त्यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना मी किती कामं केली आहेत याबद्दल काहीच माहिती नाहीये आणि जे ट्रोल करतायत ती माझीच मुलं आहेत असंही म्हटलं आहे. सचिन पिळगांवकर नेमकं काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊ.

ट्रोल करणाऱ्यांना मी आशीर्वाद देईन – सचिन पिळगांवकर

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकरांना त्यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दल विचारल्यानंतर ते म्हणाले, “मला वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं. दुसरी गोष्ट म्हणजे ही पोरं आहेत. महाराष्ट्राची पोरं आहेत. फक्त माझ्याबद्दलच नाही इतरांनाही ट्रोल करतात. कित्येकांना ट्रोल करतात. त्यांच्या हातातील यंत्राचा वापर कसा करायचा हे ते शिकत आहेत. पुढे अजून काही शिकतील, त्यांचं करिअर करतील आणि त्यांचं नाव मोठं करतील. त्यामुळे तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला. तुम्ही महाराष्ट्राची मुलं आहात म्हणजे माझी मुलं आहात. मी तुम्हाला आशीर्वादच देईन.”

सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, “मला शिवीगाळ केली तर मल काय कोणालाही ते आवडणार नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर करा.” पुढे त्यांना मुलाखतींमधील त्यांचे किस्से व्हायरल करुन त्यावरुनही ट्रोल केलं जातं यामुळे वाईट वाटत नाही का असं विचारल्यानंतर ते म्हणाले, “वाईट वाटायचं कारणच नाही कारण त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्या वयाचा आहे. त्यांना माहीतच नाहीये की मी आता सत्तरी गाठतोय. मी साडे चार वर्षांचा असल्यापासून काम करतोय. माझा अनुभव किती वर्षांचा आहे याची माहितीच त्यांना नाहीये.”

सचिन पिळगांवकर पुढे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा उल्लेख करत म्हणाले, “धरमजी गेल्यानंतर त्यांच्याबरोबरचा माझा फोटो मी पोस्ट केला. तो खूप व्हायरल झाला. त्यांना असं वाटलं की मी हे ऐआय करुन केलंय का? म्हणजे त्यांना माहितीच नाहीये की मी धरमजींबरोबरही काम केलंय. मिना कुमारींबरोबरही काम केलंय. काही लोकांना तर हेही म्हटलं की ह्याला नॅश्नल अवॉर्ड मिळालाच नाही आणि हा खोटं बोलतोय. मी शेवटी फोटो टाकला. की माझे काही शुभचिंतक आहेत त्यांना वाटतंय हे खोटं आहे त्यांनी हा फोटो बघा. आता त्याला काही मर्यादा नाहीये. जे सत्य आहे ते यांच्या कमेंट्समुळे असत्या होणार आहे का? मी खोटं बोलत असेल तर मला भीती वाटेल.”

माझ्याकडून ऐकलं नाही, तर माझ्यानंतर कोणाकडून ऐकणार? – सचिन पिळगांवकर

होणार्‍या टीकेबद्दल सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, “माझा जो इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मी इतक्या लोकांबरोबर काम केलंय त्यांच्याबरोबरचा अनुभव मी सांगतोय तर तो मिच सांगणार आणि दुसरी गोष्ट आता जर तुम्ही तो माझ्याकडून नाही ऐकला तर माझ्यानंतर कोणाकडून ऐकणार. तुम्हाला ऐकायला मिळेल का. माझ्यासारखा माणूस काय करेन मी तो अनुभव ऐकेन मी त्याला थांबवणार नाही. त्यामुळे ज्यांना जे बोलायचं आहे त्यांनी माझ्या मुलांनी ते बोलावं, पण मी बोलायचं थांबवणार नाही.”