मातृत्व हे स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग मानलं जातं. हल्ली अनेक स्त्रिया ठामपणे त्यांना कधीच आई व्हायचं नाहीये तर काही जणी त्यांना मातृत्व अनुभवायचं आहे याबद्दल स्पष्टपणे बोलतात. अनेक अभिनेत्रीही मातृत्वाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया ठामपणे व्यक्त करत असतात. अलीकडे अनेक अभिनेत्रींनी तर अगदी चाळीशीत आई होण्याचा निर्णय घेतला आणि आता त्या मातृत्व अनुभवत आहेत. अशातच आता आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या सई ताम्हणकरने याबद्दल भाष्य केलं आहे.
सई ताम्हणकर अनेकदा इंडस्ट्रीतील गोष्टी असो, वादाचा कुठला मुद्दा असो किंवा ट्रोलिंग असो ठामपणे तिची मतं, प्रतिक्रिया मांडत असते. सध्या ती तिच्या ‘अडकित्ता’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबरला झी ५वर रिलीज होणार आहे. सई यामधून एका वेगळ्या भूमिकेतून झळकणार आहे. तिच्याबरोबर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले हे दोघेही प्रमुख भूमिकेत आहेत. यामध्ये ऑफिस लाईफ, आजच्या काळातील पालकत्व या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये मातृत्वाची वेगळी बाजूसुद्धा पाहायला मिळणार आहे. अशातच आता सईने याबद्दल सांगितलं आहे. सई ताम्हणकरने या चित्रपटाच्या निमित्तान संवाद साधत असताना भविष्यात आई होण्याबद्दल भाष्य केलं आहे.
आई होण्याबद्दल सई काय म्हणाली?
कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकरला आईची भूमिका साकारण्याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “किशोरवयीन मुलाची आई थोडी वेगळी असेल, लहान मुलाची आई थोडी वेगळी वागत असेन हे सगळे अनुभव मला माझ्या कामाच्या निमित्ताने घेता येतात. गंमत म्हणजे हे सगळं करुन जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर वेगळाच प्रयोग होईल. त्यामुळे मला असं वाटतं की हेच आमच्या क्षेत्राचं वेगळेपण आहे.”
सई ताम्हणकर अनेकदा तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मराठीसह तिने हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकृतींमध्येही काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सई फक्त अभिनयासाठी नाही तर तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही अनेकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.
दरम्यान, अलीकडे सई विविध कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने अनेक चित्रपटांतून हटके भूमिका साकारल्या आहेत. आता ‘अडकित्ता’ या चित्रपटातूनही ती वेगळ्या भूमिकेतून आणि वेगळ्या लूकमधून पाहायला मिळणार आहे.
