Sai Tamhankar on cofactors of Tumbadchi Manjula: सई ताम्हणकर सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिचे अनेक सिनेमे गाजले आहेत. मंगलाष्टक वन्स मोअर, अनुबंध, वाय झेड,सनई चौघडे, गर्लफ्रेंड,दुनियादारी, नो एन्ट्री पुढे धोका आहे, मिडियम स्पायसी, कुलकर्णी चौकातला देशपांडे, वजनदार, टाइम प्लीज याबरोबरच मानवत मर्डर्स, क्राइम बीट, ग्राउंड झिरो, मिमी, मटका किंग अशा मराठी-हिंदी सिनेमात, काही वेब सीरिजमध्ये काही काम केले आहे. सईने आजवर विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अनेक भूमिकांचे कौतुक झाले आहे.
लवकरच सई तुंबाडची मंजुळा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. या सिनेमात तिच्याबरोबर अनेक लोकप्रिय कलाकाराही दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीदेखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
“याआधीसुद्धा एक-दोन वेळा आम्हाला एकत्र काम करण्याची संधी…”
आता एका मुलाखतीत सईने उषा नाडकर्णी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. तुंबाडची मंजुळा सिनेमाच्या संपू्र्ण टीमने नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सईने सिनेमांतील इतर कलाकारांबद्दलही वक्तव्य केले. जितेंद्र जोशी यांच्याबद्दल ती म्हणाली, “याआधीसुद्धा एक-दोन वेळा आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती. पण, अगदी शेवटच्या घडीला ते होऊ शकलं नाही. पण, इतक्या वर्षांबरोबर एकमेकांबरोबर काम करायला मजा आली.”
पुढे ती म्हणाली, “एक असतं की जेव्हा मित्र सहकलाकार असतो, तेव्हा तुम्हाला माहित असतं की तो मित्र म्हणून कसा आहे, माणूस म्हणून कसा आहे. इतक्या वर्षांमध्ये एकमेकांची किती प्रगती झाली आहे, हे अनुभवणं खूप मजेशीर असतं. पुढे ती म्हणाली की योगेश आणि मी सुद्धा दुनियादारीनंतर या सिनेमात एकत्र काम केलं आहे. तसंच मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर मानवत मर्डर्सनंतर एकत्र काम केलं. काही काळ अंशुमन हास्यजत्रेत होता.”
“आऊबरोबर मी पहिल्यांदा…”
उषा नाडकर्णी यांच्याबरोबर काम करण्याबद्दल ती म्हणाली, “आऊ (उषा नाडकर्णी)बरोबर मी पहिल्यांदा काम केलं आहे. तिचा सहवास, तिचे व्यक्तीमत्त्व मला खूप आवडते. ती जे काही आहे, ते तोंडावर बोलते. ती मागे बोलत नाही. मला असे लोक फार आवडतात. कारण- मी स्वत: तशी आहे. मला आऊबरोबर काम करायला मजा आली. कारण- मला असं वाटतं की अनुभव जास्त राहतो, टिकतो. बाकी यश-अपयश येतात-जातात. चांगले अनुभव जास्त जपले जातात.”
तुंबाडची मंजुळा या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्याबरोबरच अंशुमन विचारे, ओम भुतकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन विविथ कोरगावकर यांनी केले आहे. हा सिनेमा ५ जून २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
