Sai Tamhankar On Prajakta Mali Cannes Look : ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ या प्रतिष्ठित सोहळ्याला यंदा लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने उपस्थिती लावली होती. मराठी भाषेचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी प्राजक्ता माळी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हे सगळे कलाकार कान्सला पोहोचले होते. यावेळी कान्सच्या रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीने सुंदर अशी नऊवारी साडी नेसली होती. तिच्या या पारंपरिक लूकचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. प्राजक्ताचे रेड कार्पेटवरील असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पहिल्यांदाच रेड कार्पेटवर येऊनही तिचा आत्मविश्वास, रुबाबदार अंदाज या सगळ्याचं चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील कौतुक केलं.
मात्र, प्राजक्ताला काही लोकांनी विनाकारण ट्रोलही केलं. या सगळ्यांचा समाचार घेत सई ताम्हणकरने आपल्या लाडक्या मैत्रिणीला पाठिंबा दिला आहे. सई ताम्हणकर महाराष्ट्र टाइम्सशी संवाद साधताना म्हणाली, “मी कधी कान्सला गेले, तर मला माझा चित्रपट कान्सपर्यंत घेऊन जायला आवडेल. जेवढं मी काम करणं एन्जॉय करते…तेवढंच मी फोटोशूट, स्टाइल वगैरेही तेवढंच एन्जॉय करते. त्यामुळे मला नवनवीन प्रयोग करायला नेहमीच आवडतात.”
“एक गोष्ट मी आवर्जून नमूद करते…मला प्राजक्ता माळीचा खूप-खूप अभिमान आहे. मला असं वाटतं…ज्या सुंदर पद्धतीने तिने स्वत:ला कान्सच्या रेड कार्पेटवर सादर केलं, ते खूप भारी होतं. अर्थात ज्यामुळे खूप लोकांना मिरची लागलेली आहे कारण, तिच्याकडे खूप लोकांचं लक्ष आहे…आणि मला तुझा खूप अभिमान वाटतोय प्राजक्ता! माणसं काहीही केलं तरी बोलतात, आता तक्रारी करण्यापेक्षा एखाद्याचं यश आपण सेलिब्रेट केलं पाहिजे.” असं सईने सांगितलं.
दरम्यान, रेड कार्पेटवर एन्ट्री घेतल्यावर प्राजक्ताच्या चेहऱ्यावर प्रेक्षकांना कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. मोरपिशी रंगाची नऊवारी साडी, त्यावर भरजरी शेला, गळ्यात ठुशी, हातात मराठमोळे तोडे, कमरपट्टा असा पारंपरिक साज करून प्राजक्ता कान्सच्या रेड कार्पेटवर चालली.
प्राजक्ताने या सोहळ्याला पेशवाई सिल्क नऊवारी साडी नेसली होती, आणि तिने संपूर्ण ज्वेलरी तिच्या स्वत:च्या ‘प्राजक्तसाज’ ब्रँडची परिधान केली होती. यावेळी अभिनेत्रीने ११५ वर्षे जुनी नथ परिधान केली होती. ही एका रॉयल कुटुंबाची नथ असल्याचं प्राजक्ताने फोटोच्या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. तसेच लवकरच ही नथ ‘प्राजक्तसाज’च्या कलेक्शनमध्येही उपलब्ध केली जाईल, असंही तिने लिहिलं आहे.
