मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे या दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.
विशेष म्हणजे ‘बोल बोल राणी’च्या माध्यमातून १५ वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून, एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. रहस्य, थ्रिल या सगळ्याचा अनुभव हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना येईल. टीझरमध्ये सई ताम्हणकरचे वेगवेगळे लूक लक्ष वेधून घेतात.
चित्रपटाबद्दल निर्माते, दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, “थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावं.”
“बोल बोल राणी’ हा केवळ एक सस्पेन्स चित्रपट नसून, मानवी स्वभावाचं आणि नातेसंबंधांचं अनेक पदर उलगडणारा एक थ्रिलर अनुभव आहे. आजचा प्रेक्षक सुजाण आहे, त्याला पडद्यावर काहीतरी वेगळं आणि खिळवून ठेवणारं हवं असतं. या चित्रपटाची कथा आणि त्यातील प्रत्येक पात्राचा संघर्ष प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. चित्रपटाच्या टीझरच्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे, मुख्य चित्रपटात प्रेक्षकांसाठी रहस्याचा एक मोठा खजिना दडला आहे, जो १० जुलै रोजी चित्रपटगृहात उलगडेल.” असं दिग्दर्शकांनी सांगितलं.
अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर, अमित भानुशाली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर हिच्यासह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, संभाजी ससाणे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
