Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या आठवा आठवडा सुरू आहे. १०० पैकी ५० दिवस ओलांडले आहेत. आता फक्त घरात नऊ सदस्य बाकी राहिले आहेत. पण जसे जसे सदस्य कमी होतायत तशी तशी घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर आता अरबाज, निक्कीबरोबर खेळताना दिसत आहेत. तसंच नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये ‘बी टीम’मध्ये खेळत असूनही संग्राम व जान्हवीने अरबाजबरोबर केलेली डील चांगलीच महागात पडलेली पाहायला मिळाली. कॅप्टन्सी टास्कमधून संपूर्ण ‘बी टीम’ बाद झाली. ‘बिग बॉस घरात’ असं सर्व चित्र असताना सई ताम्हणकरने या लोकप्रिय शोविषयी भाष्य केलं आहे. तसंच ‘बिग बॉस मराठी’मधील एका सदस्याचा स्वभाव आवडला असल्याचा तिने सांगितलं. सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाविषयी अनेक मराठी कलाकार बोलत असतात. ‘बिग बॉस’च्या घरात घडणाऱ्या गोष्टींवर सोशल मीडियाद्वारे परखड मत व्यक्त करत असतात. पुष्कर जोग, उत्कर्ष शिंदे, विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, सिद्धार्थ जाधव, मिरा जगन्नाथ असे बरेच कलाकार शोमधील कोणत्या ना कोणत्या सदस्याला पाठिंबा देण्यासाठी पोस्ट करत असतात. अशातच सई ताम्हणकरने देखील ‘बिग बॉस मराठी’बद्दल भाष्य करत एका सदस्याविषयी बोलली.
‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना सईला विचारलं की, बिग बॉस बघते का? तेव्हा सई म्हणाली, “मी बिग बॉस फॉलो करत नाही. पण वर्षाताई आणि निक्की तांबोळी हा विषयी रील्सच्या माध्यमातून थोडाफार कळाला. वर्षाताई किती चिडल्या तरीही त्यांची भाषा आणि त्यांचा संयम सुटत नाही, हे मला खूप आवडलं आणि मला हे खूप गोड वाटलं. वर्षाताईंची ही बाजू आम्हाला माहिती असण्याचं काहीच कारण नाही. वर्षाताईंबरोबर मला एकदाच काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर काहीच नाही. त्यामुळे त्यांची ही बाजू बघायला मजा आली.”
हेही वाचा – Video: अंकिता, पंढरीनाथने निक्कीची केली हुबेहूब नक्कल, ‘बी’ टीममध्ये रंगली निक्कीच्या चालण्यावरून चर्चा
दरम्यान, सई ताम्हणकर सध्या ‘मानवत मर्डर’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘सोनी लिव्ह’वर ही सीरिज प्रदर्शित होणार असून सत्य घटनेवर आधारित आहे. या सीरिजमध्ये सई व्यतिरिक्त आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आहे. आशिष बेंडेने दिग्दर्शित केलेली ‘मानवत मर्डर’ सीरिज ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मराठीसह हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, बेंगाली या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd