Sairat Actor Tanaji Galgunde Family: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्यातील पात्रांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटात ‘लंगड्या’ची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता तानाजी गळगुंडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तानाजीची पत्नी प्रतीक्षा शेट्टी हिने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा फोटो शेअर केला असून, या चिमुकल्याचा चेहरा पाहून चाहते थक्क झाले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधल्यानंतर, ऑगस्ट २०२५ मध्ये या दाम्पत्याने मुलाचे स्वागत केले होते. प्रतीक्षाने शेअर केलेला हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
तानाजी गळगुंडेने एका मुलाखतीत त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. त्याच्या आंतरजातीय लग्नाला कुटुंबाचा विरोध होता, असं तो म्हणाला होता. तानाजीने काही वर्षांचे अफेअर, लिव्ह इन रिलेशनशिपनंतर गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टीबरोबर डिसेंबर, २०२४ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर जून महिन्यात प्रतीक्षाचे डोहाळे जेवण पार पडले आणि ऑगस्ट २०२५ मध्ये प्रतीक्षाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. तानाजी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत नसला तरी प्रतीक्षा मात्र अपडेट्स देत असते. प्रतीक्षाने आता मुलाबरोबरचा फोटो पोस्ट करून त्याचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.
पाहा प्रतीक्षा शेट्टीने पोस्ट केलेला फोटो
फोटोमध्ये प्रतीक्षा व तिचा लाडका मुलगा एकमेकांकडे बघत आहेत. तानाजी व प्रतीक्षाचा मुलगा खूपच क्यूट दिसतोय.
दरम्यान, यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये प्रतीक्षाने तानाजीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो वेरुळचा होता. तानाजीने प्रतीक्षाबरोबर वेरुळमध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं होतं. दोघांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.
प्रतीक्षा शेट्टी कोण आहे?
प्रतीक्षा शेट्टी हिचा होममेड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. तसेच ती कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग, फोटोशूटही करते असं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसत आहे.
आंतरजातीय नात्याबद्दल काय म्हणाला होता तानाजी गळगुंडे?
“माझी गर्लफ्रेंड वेगळ्या जातीतली आहे. दोघेही वेगवेगळ्या जातीचे आहोत. मी जातीवाद मानत नाही. मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलो आहे. नात्याला पाच-सहा वर्षे झाली पण मी घरी काहीच सांगितलं नाही. आम्ही दोघेही पुण्यात होतो आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना ते पटणार नव्हतं,” असं तानाजी म्हणाला होता.
गर्लफ्रेंडने हट्ट केल्याने आईला तिच्याबद्दल सांगितलं. पण आईला समजल्यावर ती खूप भांडली. याउलट त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरचे पुढारलेले असून त्यांना या नात्याबद्दल काहीच आक्षेप नसल्याचं तानाजीने ‘आरपार’ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
