Marathi Actress Rinku Rajguru : ‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झुंड’, ‘झिम्मा २’सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. सिनेमातल्या प्रत्येक भूमिकांमधून तिनं प्रेक्षकांसमोर अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. नुकताच तिचा ‘आशा’ नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि यानिमित्त ती सर्वत्र मुलाखती देत आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
रिंकू राजगुरूला आजवर अनेकदा लग्न अणि होणाऱ्या जोडीदाराविषयीही विचारलं गेलंय. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत तिला लग्नानंतर काम करायला नवऱ्यानं परवानगी दिली नाही तर? तसंच शहरातला मुलगा हवा की गावचा मुलगा हवा? यावर तिची स्पष्टं मतं व्यक्त केली आहेत.
याबद्दल रिंकू म्हणाली, “मी ते लग्नाआधीच स्पष्ट करुन घेईन. कारण कामाने मला ओळख दिली आहे. खरंतर, या खूप लांबच्या गोष्टी आहेत. ज्या गोष्टींसाठी आई-वडीलांनीही कधी हात पकडला नाही, तिथे दुसऱ्यानेही हात पकडू नये. मला ते स्वातंत्र्य हवं आहे. असं नाही की, मी काहीही चुकीचं आणि वेगळं करतेय; तसं करत असेल तर मला आवर्जुन येऊन सांगावं. मग कोणीही असेल; मी ऐकते. पण कामापासून कधी थांबवू नये.”
ती पुढे म्हणते, “इतकी वर्ष जितकं आपण कामाबरोबर जगतो, ते कोणीतरी एक महिना आयुष्यात राहिलेला माणूस जर हिसकावून घेत असेल तर त्यापेक्षा वाईट काहीच नाही. मग तो माणूसच नको. मला वाटतं, प्रेम करताना आपण समोरच्याला त्याच्या कामासह स्वीकारतो. त्यामुळे आपण त्याला काम करताना अडवत नाही. तुला आवडतंय ना… मग तू कर… असं ते असतं. पण ती खूपच करते अणि आपल्यापेक्षा भारी करतेय असं वाटलं, तर मग त्याला इर्ष्या म्हणतात. कारण म्हणूनच आपण समोरच्याला थांबवतो. त्यापेक्षा मग लग्नच नको.”
‘आरपार’च्या मुलाखतीत रिंकूला पुढे तुला शहरातला मुलगा हवा की गावचा मुलगा हवा? असंही विचारण्यात आलं. याबद्दल ती म्हणाली, “मी शहरात किंवा गावात रमणारी अशी मुलगी नाही. मी चांगली माणसं असतील, तर कुठेही राहायला तयार असते. माझे आई-वडील आज मुंबईत राहत असते, तर मी मुंबईत कायमस्वरुपी राहिले असते. माझं शहर-गाव असं नाही. जिथे माझी माणसं भेटतील तिथे मी राहते आणि रमते. मुलगा चांगला असेल तर, तो कुठेही का असेना…”
दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिचा नुकताच ‘आशा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर लवकरच ती ‘साडे माडे ३’ या सिनेमातही दिसणार आहे. यात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसंच तिनं मुलाखतीत उल्लेख केल्याप्रमाणे तिचा एक हिंदी सिनेमाही आगामी काळात येणार आहे.
