नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘सैराट’च्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांनी इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. रिंकू आणि आकाशप्रमाणे अरबाज शेख, तानाजी गळगुंडे हे कलाकार सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाले. यापैकी अरबाजने ( सल्ल्या ) सोशल मीडियावर नुकतेच त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला. ४ मे रोजी त्याने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. पण, प्रत्यक्षात या अभिनेत्याचं लग्न ३ वर्षांपूर्वी झालेलं आहे. याबाबत त्याने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
अरबाज म्हणाला, “माझ्या पत्नीचं नाव आहे सिमरन. आम्ही चौथीपर्यंत एकत्र शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ती पुण्याला आली. आता ती पुण्याला शिफ्ट झाल्यामुळे आमचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता. मग दहावीत असताना मी तिचा नंबर मिळवला आणि तिला एक मेसेज केला. मी हिला शायरी पाठवली होती, पण सिमरनने तो मेसेज भावाला दाखवला. त्यानंतर मग हिचा भाऊ मला ओरडला. तेव्हा मी खूप घाबरलो होतो आणि मग तिथून पुढे हिला अजिबात मेसेज केला नाही. काही दिवसांनी मग ‘सैराट’ चित्रपट आला. सिमरनने सिनेमा पाहिला की नाही मला काहीच माहीत नव्हतं. पण, मला ती मनापासून आवडत होती म्हणून एके दिवशी रात्री मी पुन्हा तिला मेसेज केला. मग हळुहळू आमचं छान बोलणं सुरू झालं.”
सिमरन यावर म्हणाली, “मी याला लहानपणापासून आवडते याची मला काहीच कल्पना नव्हती. २०१९ मध्ये आम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. लॉकडाऊनच्या काळात आमचं बोलणं वाढलं आणि मग याने मला प्रपोज केलं होतं. मी त्याला दोन वर्षांनी होकार दिला होता.”
“रिलेशनशिपला एक-दीड वर्ष झाल्यावर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. कारण, हिच्या घरून लग्नाला थोडा विरोध होता. मग, अचानक एक दिवस आम्ही ठरवलं की आता लग्न करायचं. आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि आठ दिवसांनी सर्वांना व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगितलं, त्यांना फोटो पाठवला होता. घरच्यांना सुद्धा याची थोडीफार कल्पना होती की आम्ही असं करू शकतो. कारण, आम्ही रितसर लग्नाची परवानगी आधी मागितली होती. आम्ही एकमेकांना भेटायचो हे सुद्धा घरी माहीत होतं. आमचं लग्न तीन वर्षांपूर्वीच झालंय. जे आता आम्ही फोटो शेअर केलेत ते फक्त आम्ही फोटोशूट केलं होतं.” असं अरबाज शेखने सांगितलं.
