Sairat fame Arbaz Shaikh interview : ‘सैराट’फेम अभिनेता अरबाज शेख आता हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. ‘सैराट’ चित्रपटामध्ये त्याने साकारलेले सलीम शेख हे पात्र जोरदार गाजले होते. त्यानंतर तो काही मालिका व चित्रपटांमध्ये झळकला होता. मात्र, त्याला खरी ओळख नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे मिळाली. ‘सैराट’मधील सल्या या पात्राने अरबाजला घराघरामध्ये ओळख मिळवून दिली. मात्र, त्या चित्रपटानंतर तीन वर्षे कोणतेही काम केले नसल्याचा खुलासा अरबाज शेखने केला आहे. तसेच सैराट या चित्रपटानंतर त्याच्या अभिनय क्षेत्रातील कामांना सुरुवात झाली असली तरी सिनेविश्वामध्ये रोजचा संघर्ष असतोच, असेदेखील अरबाज म्हणाला आहे.

अभिनेता अरबाज शेखने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैराट या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, ‘सैराट’ १०० कोटींचा टप्पा पार करेल आणि एवढे लोक आपल्याला ओळखतील, असं मला वाटलंसुद्धा नव्हते. आता मागे वळून पाहिलं, तर खूप छान वाटतं. तेव्हा अशा गोष्टी घडतील, असं वाटलं नव्हतं. पण आता चांगलं वाटतं की, काम मिळत आहे आणि ते स्वीकारत आहे. कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. ‘सैराट’मधील सर्वांसाठी नव्या वाटा खुल्या झाल्या, असे मत अरबाज शेखने व्यक्त केले.

जवळपास तीन वर्षे काहीच काम केले नाही – अरबाज

आयुष्यातील चढ-उतारांबाबत सांगताना अरबाज म्हणाला की, आयुष्यामध्ये चढ-उतार तर पाहिजेच, त्याशिवाय यशाची किंमत कळत नाही. सैराट हा पहिलाच चित्रपट होता आणि तोच एवढा हिट झाला, लोकांनी एवढे प्रेम दिले, याची कल्पनासुद्धा केली नव्हती. पण त्यानंतर जवळपास तीन वर्षे आम्ही काही कामच केलेलं नाही. न काम करण्यासाठीसुद्धा काही कारणं होती. त्यावेळी काम करण्यासाठी का थांबलो हे आता कळत आहे. आता हळूहळू काही काही काम करीत आहोत आणि लोकांनासुद्धा ते आवडत आहे. तर याची मजा येत आहे, असे अभिनेता अरबाज शेखने सांगितले आहे.

अरबाज करायचा नागराज मंजुळे यांना फेसबूकवर मेसेज

पुढे तो म्हणाला की, ‘सैराट’ आला तेव्हा मी फक्त १६ वर्षांचा होतो. त्यानंतर नागराजसरांनी आमच्या डोक्यामध्ये चित्रपटाच्या यशाची हवा जाऊ दिली नाही. फ्रॅंड्री या चित्रपटापासून चित्रपटामध्ये घेण्यासाठी नागराजसरांच्या मागे लागलो होतो. घर जवळ असल्यामुळे ते मला घरातील सामान आणण्याचं काम लावत असत. तेव्हा नागराजसरांना म्हणालो, तुम्ही दुकानातून सामान आणण्याचं काम लावता बरोबर आणि फिल्मचं काम असलं की, मला घेत नाही. फेसबुकवर त्यांना खूप मेसेज करायचो. आता जर त्यांनी ते पाहिले, तर खूप हसतील. ‘सैराट’मध्ये मला घेतले हे चार दिवस आधी सांगितले. त्याआधी त्यांनी मला सांगितलेच नव्हते, अशा ‘सैराट’च्या आठवणी अरबाज शेखने सांगितल्या आहेत.

मधल्या काळामध्ये सुरु केले दुसरे व्यवसाय

अरबाज शेखने चित्रपटसृष्टीबद्दल मत व्यक्त केले. तो म्हणाला की, चित्रपटाला प्रचंड यश मिळाल्यानंतर काय करायचे असते हे आम्हाला माहीत नव्हते. आता काही चित्रपट केल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात येत आहेत. पुढे जाण्यासाठी खूप अडचणी असतात, याला फसवेगिरी नाही म्हणता येणार; पण काही गोष्टी असतात. मधल्या काळामध्ये काम मिळत नव्हते तेव्हा दुसरे काम सुरू केले. आता पुन्हा चित्रपट मिळत आहेत. चित्रपट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या सिनेसृष्टीमध्ये रोजचा दिवस परीक्षेचा आहे, असे मत अभिनेता अरबाज शेखने व्यक्त केले आहे.

‘मटका किंग’ मध्ये झळकणार अरबाज

अभिनेता अरबाज शेख हा आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला असून, तो ‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये अरबाजने पोलीसाची भूमिका साकारली आहे. त्यापूर्वी अरबाज शेखने ‘सैराट’ चित्रपटामध्ये ‘सल्या’ नावाचे पात्र साकारले होते. त्याचबरोबर त्याने ‘बस्ता’, ‘झुंड’, ‘मुसंडी’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.