Sairat Actor Arbaz Sheikh Father Passes Away: नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अरबाजचे वडील असलम रसूल शेख यांचे सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने प्रथम करमाळा उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही असलम शेख यांची प्राणज्योत मालवली.

अरबाज शेखचे वडील असलम रसूल शेख ६० वर्षांचे होते. त्यांचे गुरुवारी, ३० जुलै रोजी निधन झाले. ‘सैराट’ फेम ‘सल्ल्या’ म्हणजेच अरबाज शेख याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अरबाज शेखने वडिलांचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. तर एका फोटोत त्याने त्यांचा हात हातात घेतला आहे. “असं सोडून जायचं नव्हतं”, असं कॅप्शन लिहून अरबाज शेखने पोस्ट केली आहे.

पाहा अरबाज शेखची पोस्ट

अरबाज शेखने केलेल्या पोस्टवर कमेंट करून चाहत्यांनी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अनेकांनी या कठीण काळात अरबाजला धीर दिला आहे.

असलम शेख यांना २९ जून रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. आधी त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. या रुग्णालयातील औषधांसंदर्भात अरबाज शेखने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती आणि एक लाख रुपयांची मदत अरबाज शेखला करण्यात आली. त्यानंतर असलम शेख यांना सोलापूरातील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचार सुरू असताना असलम शेख यांनी अखेरचा श्वास घेतला.