Sairat actor Tanaji Galgunde Family Photos: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून घराघरात पोहोचलेला परशाचा मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडे सध्या भलताच चर्चेत आला आहे. तानाजीची पत्नी प्रतीक्षा शेट्टी हिने इन्स्टाग्रामवर आपल्या चिमुकल्या बाळाबरोबरचे सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. तानाजी आणि प्रतीक्षाच्या लाडक्या मुलाचे नावही समोर आले आहे. हे गोड फॅमिली फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

तानाजी गळगुंडेने प्रतीक्षा शेट्टी हिच्याशी लग्न केलंय. या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. प्रतीक्षा सोशल मीडियावर मुलाबरोबरचे गोंडस फोटो शेअर करत असते. आता तिने मुलगा व पतीबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तानाजी गळगुंडेच्या या फॅमिली फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.

प्रतीक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ३ फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती व तानाजी त्यांच्या बाळाबरोबर दिसत आहेत. एका फोटोत प्रतीक्षा बाळाला कॅमेऱ्याकडे बघायला सांगतेय, दुसऱ्या फोटोत ते तिघेही पोज देतात आणि तिसरा फोटो प्रतीक्षा व तानाजी यांचा सेल्फी आहे.

पाहा तानाजी गळगुंडेचे फॅमिली फोटो

तानाजी व प्रतीक्षा यांच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘ज्युनिअर तानाजी’, ‘छान’, ‘छोटा डॉन’, अशा कमेंट्स या फोटोंवर आहेत. तसेच काहींनी रेड हार्ट इमोजीही कमेंट्स केल्या आहेत.

तानाजी गळगुंडे व प्रतीक्षा शेट्टीच्या मुलाचं नाव काय?

तानाजी व प्रतीक्षा यांनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर डिसेंबर, २०२४ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. त्यानंतर जून २०२५ मध्ये प्रतीक्षाचं डोहाळे जेवण झालं होतं आणि ऑगस्ट २०२५ मध्ये प्रतीक्षाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तानाजी व प्रतीक्षा यांचा लाडका मुलगा लवकरच एका वर्षाचा होणार आहे. विशेष म्हणजे त्याचं नाव काय, ते स्वतः प्रतीक्षाने सांगितलं आहे. प्रतीक्षा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम बायोमुळे सम्यकची आई, असं लिहिलंय. म्हणजेच त्यांच्या मुलाचं नाव सम्यक प्रतीक्षा तानाजी गळगुंडे असं आहे.

आंतरजातीय लग्नामुळे कुटुंबियांचा नात्याला होता विरोध

दरम्यान, प्रतीक्षाबरोबरच्या नात्याला तानाजीच्या कुटुंबाचा विरोध होता, तानाजीने स्वतः याबद्दल सांगितलं होतं. लग्नापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तानाजीने म्हटलं होतं की त्याची व त्याच्या गर्लफ्रेंडची जात वेगळी आहे. “मी जातीवाद मानत नाही. मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलो आहे. नात्याला पाच-सहा वर्षे झाली पण मी घरी काहीच सांगितलं नाही. आम्ही दोघेही पुण्यात होतो आणि मी घरी काहीच सांगितलं नव्हतं. कारण त्यांना ते पटणार नव्हतं,” असं तानाजीने म्हटलं होतं. तानाजीच्या आईला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल समजल्यावर ती खूप भांडली होती, असा खुलासाही त्याने केला होता.