Sakhe Ga Sajani Trailer: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या मैत्री आणि ट्रॅव्हल डायरीजवर आधारित चित्रपटांची लाट असून, यात आता ‘सखे गं साजणी’ या नव्या चित्रपटाची भर पडली आहे. प्रार्थना बेहरे, पूजा सावंत (Pooja Sawant) आणि अभिजीत खांडकेकर या लोकप्रिय त्रिकुटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधून तीन मित्रांच्या आयुष्यातील चढ-उतार, त्यांचे घट्ट नाते आणि एका रोमांचक प्रवासाची झलक पाहायला मिळते. दिग्दर्शक अभिषेक जावकर यांनी मांडलेली ही कथा केवळ मैत्रीच नाही, तर आयुष्यातील सुंदर क्षणांचा उत्सव साजरी करणारी ठरणार आहे.

प्रार्थना बेहरे, अभिजीत खांडकेकर व पूजा सावंत यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि प्रवासाची नवी कहाणी घेऊन येणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला. तीन मित्रांच्या प्रवासावर आधारित असलेला हा मराठीतील एक हटके चित्रपट आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून तीन मित्रांच्या प्रवासाची, त्यांच्या नात्यांची आणि भावनिक क्षणांची सुंदर झलक पाहायला मिळते. मजा, साहस आणि भावना यांचा सुरेख मिलाफ ट्रेलरमधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Award Banner

सखे गं साजणीचा ट्रेलर

याआधी चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून, त्यापैकी ‘सखे गं साजणी’ शीर्षक गीताला लाखो व्ह्यूज मिळाले आहे. हे गाणं अभिजीत सावंत यांनी गायले असून, संगीत विजय भाटे यांनी दिले आहे. गीतकार लखन चौधरी यांच्या शब्दांनी या गाण्याला भावनिक आणि उत्साही रंग दिला आहे.

‘डीजे चा बास’ हे आणखी एक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हं गाणं करण सावंत आणि श्वेता ठाकूर यांनी गायलं असून, त्याचे संगीतही विजय भाटे यांनी दिलं आहे. या गाण्याचे शब्द लखन चौधरी यांनी लिहिले आहेत. दोन्ही गाण्यांमधून चित्रपटातील मैत्री, उत्साह आणि प्रवासाचा जल्लोष अनुभवायला मिळतो.

अभिषेक जावकर दिग्दर्शित या चित्रपटात प्रार्थना बेहरे, पूजा सावंत व अभिजीत खांडकेकर या तिघांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट मैत्री, प्रवास आणि आयुष्यातील खास क्षणांची गोष्ट मांडणारा असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि आनंददायी अनुभव देण्यास सज्ज आहे. ‘सखे गं साजणी’ हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.