Sakhi Gokhale On Tighi Movie: सखी गोखले ही सध्या ‘वरवरचे वधूवर’ या नाटकामुळे चर्चेत आहे. तसेच, सोशल मीडियावरील विविध पोस्टच्या माध्यमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तिघी’ या सिनेमाबद्दल मत व्यक्त केले आहे.
“जितेंद्र जोशींनी…”
सखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, “काल मी तिघी हा चित्रपट पाहिला. जिजिविषा काळेचं दिग्दर्शन आहे. खरंतर या चित्रपटाच्या माध्यमातून तिचं दिग्दर्शनात पदार्पण आहे, पण तिची पहिली वेळ असेल असं अजिबात वाटत नाही. इतका सहज आणि इतका सुंदर सिनेमा तयार केला आहे. चित्रपट बघताना किंवा संपल्यानंतर लक्षात येतं की तिचा अनेक वर्षांचा अभ्यास आहे.”
“उत्तम निरीक्षणशक्ती आहे. फक्त तिची नाही तर निखिल महाजन, ज्याची पटकथा आहे; प्राजक्त देशमुख ज्याचे संवाद आहेत. या दोघांनी खूप बारकाईने त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांचे निरिक्षण केले आहे. जितेंद्र जोशींनी गाणी लिहिली आहेत आणि ती भिडणारी आहेत. ती गाणी ज्या ज्या प्रसंगांना येतात, तशी सिनेमाची उंची वाढत जाते.” असे म्हणत सखीने कौतुक केले.
सखी पुढे म्हणाली, “प्रत्येक पात्राच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आणि मग त्या सगळ्यांना जोडणारी ही एक गोष्ट, असा हा सिनेमा आहे. ही गोष्ट आपल्याशी जोडली जाते, जे माझ्या घरी घडलं आहे किंवा घडत आहे असं वाटत राहतं.
ती असेही म्हणाली, “आपण जसे मोठे होतो तसे आपल्या पालकांकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला लागतो. ते काही प्रसंगांना सामोरे गेले आहेत, ते कसे सामोरे गेले आहेत हे कळू लागतं. त्यांनी घेतलेले काही निर्णय होते, ज्यामुळे आपलं आयुष्य एका विशिष्ट पद्धतीने घडलं. ते आपल्याला सगळं समजायला लागतं. ती जी जाणीव आहे, ते या सिनेमात खूप सहज मांडलं आहे.”
सिनेमातील कलाकारांबद्दल सखी म्हणाली, “भारती आचरेकर यांच्या अभिनयात आयुष्य जगल्याचा ठेहराव आहे. नेहा पेंडसे व सोनाली कुलकर्णीचा मी आजवर पाहिलेला हा करिअरमधील उत्तम परफॉर्मन्स आहे. त्या अत्यंत हुशार व संवेदनशील अभिनेत्री आहेत. माध्यमाची समज त्यांची खूप चांगली आहे.”
पुढे ती म्हणाली, “सगळेच कलाकार पुष्कराज चिरपुटकर, निपुण धर्माधिकारी, मृण्मयी गोडबोले, सुव्रत जोशी, जैमिनी पाठक सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं आहे. सुनील गोडबोले, नेहा पेंडसे, निखिल महाजन आणि स्वप्नीलची निर्मिती आहे. त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. सांगायचा मुद्दा हा आहे की, अनेक वर्षांनंतर एखादा सिनेमा चर्चेत आल्यानंतर वाटत राहतं की, अरे तेव्हाच पाहायला हवा होता, तेव्हा राहून गेला. प्लीज ही संधी सोडू नका, कारण मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहताना त्याचा जो प्रभाव पडतो ते पुन्हा अनुभवता येणार नाही,” असे म्हणत सखीने चित्रपटाचे कौतुक केले. तसेच, चित्रपट पाहण्याचेदेखील आवाहन केले.
दरम्यान, अनेक कलाकार ‘तिघी’ या सिनेमाचे कौतुक करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
