Ramesh Choudhary and Pooja Sawant: गेल्या काही दिवसांपासून पूजा सावंतच्या ‘सालबर्डी’ या नवीन सिनेमाची चर्चा सुरू आहे. पूजा सावंतसह या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. भारत गणेशपुरे, शशांक शेंडे, अंशुमन विचारे हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘सालबर्डी’ या सिनेमाच्या टीमने एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. चित्रपटाच्या शूटिंगबद्दलही त्यांनी सांगितले. श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्याबद्दलही वक्तव्य केले. पूजा सावंत म्हणाली, “श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली जी मधली रेषा आहे, किती ठळक पाहिजे, किती पुसट पाहिजे याची जबाबदारी नवीन पिढीकडे आहे.”

“देवाला खूश करण्यासाठी आपण एका मुक्या जनावराला…”

पुढे ती म्हणाली, “मी आमचं उदाहरण सांगते. वाडवळकराची ही कोकणात एक पद्धत आहे, म्हणजे राखण देण्याची. अनेक वर्षे ही पद्धत चालत आली आहे. माझ्या वडिलांपर्यंत ही पद्धत चालली आहे. याला खूप महत्त्व आहे. मी त्याचा आदरही करते, पण जेव्हापासून आम्हाला म्हणजे मला, माझ्या बहिणीला, भावाला जाण आली आहे; आम्हाला जेव्हा कळायला लागलं की आपल्या देवाला खूश करण्यासाठी आपण एका मुक्या जनावराला मारतो, तेव्हा आम्ही भाऊ-बहीण वडिलांकडे गेलो आणि त्यांना विचारलं की आपण मुक्या जनावराला मारल्याने देव खूश होतात का? त्यावर माझ्या वडिलांकडे तसं पाहायला काही उत्तर नव्हतं, कारण ते परंपरा म्हणून पाळत होते. त्यानंतर आमच्या घरात ती पद्धत पाळली जात नाही. मला माझ्या वडिलांचं कौतुक करावंसं वाटतं की त्या जुन्या पिढीने या नवीन पिढीचं ऐकलं.”

‘सालबर्डी’ हा सिनेमा अंधश्रद्धेवर आधारित आहे. त्याबद्दल रमेश चौधरी श्रद्धा व अंधश्रद्धा याबद्दल म्हणाले, “ज्यावेळी सालबर्डी सिनेमाचा स्क्रीनप्ले झाला तेव्हा पितृ पंधरवडा होता. गाण्याचं रेकॉर्डिंग झालं त्यावेळी अमावस्या होती. सिनेमाचं शूटिंग झालं, ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या शेवटी, त्यावेळी पितृ पंधरवडा होता; म्हणजे २० दिवस महाराष्ट्रात कुठेही शूटिंग सुरू नव्हतं. पण, आमचं शूटिंग सुरू होतं. योगायोगाने १७ एप्रिलला सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवशीसुद्धा अमावस्या होती, त्यामुळे आम्ही कुठलीच गोष्ट मानत नाही.”

पुढे ते म्हणाले, “काम आणि मेहनतीला महत्त्व देतो. बाप्पाचे आशीर्वाद घ्या आणि कामाला सुरुवात करा. आपल्या कामातच देव आहे, मनगटातील ताकद काम केलं तरच आहे. मला एका ज्योतिषाने सांगितलं की, २०२६ मध्ये तुझ्याकडे १० सिनेमे आहेत, पण मी घरात बसलो तर मला काम मिळणार नाही, मला माझ्या कामातून माझं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल, त्यानंतरच माझ्याकडे काम येऊ शकतं. श्रद्धेला मानतो, गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेणे आणि कामाला सुरुवात करणे हे मानतो. कदाचित सालबर्डीसाठी अमावस्या शुभ आहे असं मी समजतो, कारण मी ती अशुभ मानत नाही आणि कुठल्याच गोष्टीवर विश्वासही ठेवत नाही”, असे म्हणत त्यांनी अंधश्रद्धेला महत्त्व देत नसल्याचे सांगितले.

दरम्यान, आता सालबर्डीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.