गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये एका खास गोष्टीची चर्चा रंगली होती ती म्हणजे… ‘सालबर्डी’ सिनेमाच्या पोस्टवर झळकणारी अभिनेत्री नेमकी कोण आहे? तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली असली तरी तिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली होती. अखेर तिची ओळख सर्वांसमोर उघड झालेली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच ‘सालबर्डी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एन्ट्री घेत आपल्या भूमिकेची झलक प्रेक्षकांना दाखवली. या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली, अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचं बारकाईने निरीक्षण सुद्धा केलं.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, “वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.”
यामधील थरारक स्टंट्स आणि दमदार अॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’ सिनेमाचे खास आकर्षण असणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पूजाने या सिनेमाच्या निमित्ताने मनोरमा प्रधान म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी तिला या नव्या सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.
या सिनेमाच्या पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली असून अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात या चित्रपटाची गाणी सजली आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
