Gashmeer Mahajani shares video: सध्या अनेक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये ‘माया’, ‘तिघी’ या सिनेमांचा समावेश आहे. आता लवकरच ‘सालबर्डी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पूजा सावंत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘सालबर्डी’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमध्ये अनेक खून होताना दिसले. गावात भीतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. आता हे खून कोण करते, त्यामागे काय रहस्य आहे हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच, टीझरमध्ये कोणकोणते कलाकार चित्रपटात दिसणार याची झलकदेखील दिसली होती.
चित्रपटात अनिल नगरकर, भारत गणेशपुरे, ओंकार भोजने, रोहित कोकाटे, प्रवीण डाळिंबकर, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, चित्तरंजन गिरी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, त्यांचे लूक या टीझरमध्ये पाहायला मिळतात.
गश्मीर महाजनीने शेअर केला व्हिडीओ
आता या सगळ्यात गश्मीर महाजनीदेखील चित्रपटात दिसणार असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गोंधळी येतोय लवकरच असे लिहिले आहे. तसेच देवीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. गश्मीरचा लूकही दिसत आहे.
आता गश्मीर फक्त या गाण्यापुरता चित्रपटात असणार की तो यामध्ये भूमिका साकारताना दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गश्मीर महाजनी कोणता चित्रपट किंवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वी तो ‘लक्ष्मी निवास’ या हिंदी मालिकेत दिसला होता. काही काळानंतर मालिकेतून त्याची एक्झिट झाली.
जेव्हा गश्मीर सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर संवाद साधतो, तेव्हा चाहते त्याला वेळोवेळी नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगतात. गश्मीरनेदेखील लवकरच एका प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते. आता सालबर्डीशिवाय तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रमेश चौधरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा १७ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. आता कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
