सत्य घटनांवर आधारित रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘सालबर्डी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. या निमित्ताने चित्रपटात मध्यवर्ती पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री पूजा सावंतसह, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे ही कलाकार मंडळी आणि दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात भेट देत मनमोकळ्या गप्पा मारल्या.  कुठल्याही भूमिकेसाठी अभ्यास गरजेचा  पोलीस निरीक्षक मनोरमा प्रधान ही व्यक्तिरेखा साकारताना ती दमदार असणं, दिसणं दोन्ही गरजेचं होतं आणि त्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली.

मी मुळात चटकन व्यक्त होणारी नाही, आक्रमक स्वभावाची नाही, मात्र चित्रपटात मला तो कणखरपणा दाखवण्यासाठी अभ्यास करावा लागला. आणि कुठलीही भूमिका करताना त्याचा अभ्यास केल्याशिवाय कलाकाराने सेटवर जाऊ नये, असं मत अभिनेत्री पूजा सावंत हिने व्यक्त केलं. या व्यक्तिरेखेसाठी फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि सामाजिक अभ्यासही गरजेचा होता. कारण, सिनेमा हा समाजाचं प्रतिबिंब असतो. सालबर्डी या चित्रपटाची गोष्ट अशी आहे की तिथे जे घडलं आहे ते याआधी महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये घडून गेलं आहे. अनेकदा पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती त्यांना अनोळखी असलेल्या गावांमध्ये होते. मनोरमाचीही सालबर्डी गावात नियुक्ती झाली आहे, जिथे काळ्या जादूच्या प्रभावाखाली गुन्हे घडत आहेत. त्यामुळे सर्वांगाने अभ्यास करून ही भूमिका साकारताना खूप मजा आली, अशी आठवणही पूजाने सांगितली. 

‘सालबर्डी’ या चित्रपटात गावपातळीवर राजकारण करणारा, दीर्घकाळ सत्ता उपभोगलेला आणि अजूनही आपलं वर्चस्व कायम राहावं, यासाठी गावात कुठले मुद्दे पेटवत ठेवता येतील, याविषयी विचार करत राहणार्‍या सरपंचाची भूमिका मी केली आहे, असं सांगणारे अभिनेते शशांक शेंडे आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आले आहेत. गेल्या आठवड्यातच प्रदर्शित झालेल्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रीत झालेले अंगाई गीत सध्या लोकप्रिय झाले आहे. त्याबद्दल बोलताना आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये काही गाणी सुखद धक्का देऊन गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘रेडू’ चित्रपटातलं ‘देवाक काळजी’, ‘बापल्योक’मधील ‘उमगाया बाप रं’ आणि आता हे अंगाईगीत तिन्ही गाणी प्रेक्षकांना खूप आपलीशी वाटली. अनेकांना निराश परिस्थितीत उर्जा देणारी ठरली, असं ते म्हणाले.

चित्रपटाला मूर्त स्वरुप प्रेक्षकांमुळेच येतं…

‘या चित्रपटाची पटकथा आणि मांडणीचा ढाचा असा आहे की शेवटपर्यंत गावातल्या या घटनांमागे कोण आहे हे प्रेक्षकांना लक्षात येत नाही. इतक्या सुंदर पद्धतीने दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी मांडणी केली आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला आपण वेगळा चित्रपट केला आहे असं वाटत असतं, प्रत्येकजण आपापल्या चित्रपटावर मेहनत घेत असतो, पण शेवटी त्याला मूर्त स्वरुप प्रेक्षकांमुळेच येतं. चित्रपट चांगला आहे की नाही हे प्रेक्षकच ठरवत असतात. आम्हा कलाकारांच्या बाबतीतही हे होतं. विनोदी अभिनेता म्हणून सातत्याने त्याच पद्धतीच्या भूमिकांचा रतीब घातला तर प्रेक्षक तेच तेच करतो आहेस याची जाणीव कलाकारांना करून देतात. आणि वेगळं काही केलं तर तुमची खासियत असलेली भूमिका करा, असा आग्रहही धरतात’, असं अंशुमन  विचारेने सांगितलं.

प्रथा बदलायला हव्यात… 

अंधश्रद्धेपायी घडणार्‍या घटनांवर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे अशा चित्रपटांना विरोध करण्यापेक्षा त्यातला विचार समजून घ्यायला हवा, याबद्दल या कलाकारांनी एकमत व्यक्त केलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत, एखादी कृती करणं ही एकासाठी श्रद्धेचा भाग असेल तर दुसर्‍याला ती अंधश्रद्धा वाटते. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सद्सद् विवेकबुद्धीचा वापर करायला हवा, असं मत शशांक शेंडे यांनी व्यक्त केलं. तर जुन्या अनेक प्रथा-परंपरांचे नुसतेच अनुकरण करण्यापेक्षा त्यामागचा विचार लक्षात घ्यायला हवा, काळानुसार त्यात बदल करायला हवेत. सध्या निसर्ग हाच देव आहे, त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्नांची जोड द्यायला हवी, असं मत पूजाने व्यक्त केलं. मात्र, खरोखरच जुन्या प्रथांचा नव्याने विचार करायलाच हवा, असे सांगत भारत गणेशपुरे यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं. महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याची प्रथा आहे, असं आपल्याला जुन्याजाणत्यांकडून नेहमी सांगितलं जातं. मात्र, याच महाशिवरात्रीचं औचित्य साधून एखादं बेलाचं झाड लावलं गेलं असतं तर त्याचा आज अधिक फायदा झाला असता, त्यामुळे नव्याने विचार करून या प्रथा बदलायला हव्यात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 ‘चला हवा येऊ द्या’ स्वरुपाच्या कार्यक्रमांना थोडी विश्रांती घेणं गरजेचं

चला हवा येऊ द्या’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारखे विनोदी कार्यक्रम आजच्या काळात आवश्यकच आहेत. या सगळ्या कार्यक्रमातील छोट्या-छोट्या प्रहसनांचे व्हिडिओ सध्या उपलब्ध आहेत आणि रोजच्या धावपळीत थकलेला माणूस ते आवर्जून पाहतो आणि स्वत:ची करमणूक करून घेतो. मात्र, सातत्याने समकालीन नवीन विषयांवर लिहित राहणं हे आव्हान आहे आणि तोचतोचपणा येऊ नये म्हणून अशा कार्यक्रमांनी थोडी विश्रांती घेणं आवश्यक असतं, असं मत भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केलं. तर स्टँड अप कॉमेडीचे कार्यक्रम ठिकठिकाणी होतात, तिथला प्रेक्षक मर्यादित आणि स्वत:वर झालेले विनोदही खुल्या दिलाने स्वीकारणारा असतो. त्यामुळे तरुण कलाकारांना अधिक वाव मिळतो, असं शशांक शेंडे यांनी सांगितलं.

समाजमाध्यमांमुळे तरुण कलाकारांना विनोदी अभिनयासाठी चांगलं व्यासपीठ मिळालं आहे, असं सांगतानाच या माध्यमाचा विनोदी कलाकारांनी योग्य उपयोग करायला हवा. ओढूनताणून विनोद करण्यापेक्षा सतत वाचन, निरीक्षण आणि भवतालात जे सुरू आहे त्याचा वेध घेत राहायला हवं, असं मत अंशुमनने व्यक्त केलं.

चित्रीकरण हाँगकाँगमध्ये

‘सालबर्डी’ चित्रपटाचं चित्रीकरण अहमदनगरमधल्या दोन गावांमध्ये झालं आहे. मात्र, या चित्रीकरणाची गंमत थेट हाँगकाँगशी कशी जुळली याचा किस्साही भारत गणेशपुरे यांनी सांगितला. या चित्रपटाचं चित्रीकरण शनी शिंगणापूरजवळच्या हिंगोणी आणि कांगोणी या दोन गावांमध्ये झालं. त्यावेळी तिथल्या स्थानिक वृत्तपत्रात या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या आपल्या हाँगकाँगमध्ये सुरू असल्याचं वृत्त छापून आलं. तेव्हा आम्हाला माहिती मिळाली की त्या दोन गावांना तिथे हाँगकाँग म्हटलं जातं, अशी आठवणही त्यांनी सांगितली.