Salbardi Teaser: सध्या चित्रपटगृहात अनेक चित्रपट हजेरी लावत आहेत. मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका असलेला ‘माया’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. २७ जानेवारी २०२६ ला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.
याबरोबरच, ‘तिघी’ सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तिघी’ हा सिनेमा ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
या मराठी सिनेमाबरोबरच चित्रपटगृहात तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला ‘अस्सी’, शाहिद कपूर-तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ओ रोमिओ’, तसेच कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड’ हे हिंदी सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची मेजवानी आहे.
‘सालबर्डी’चा थरारक टीझर
आता यामध्ये आणखी एका मराठी चित्रपटाची भर पडणार आहे. या चित्रपटाने नाव ‘सालबर्डी’ असे आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
टीझरच्या सुरुवातीला एक भयावह संगीत ऐकायला येते. अंधारात एक छोटा मुलगा बॅटरी घेऊन शोधत असल्याचे दिसते. पुढे ऐकायला मिळते की, गेल्या काही महिन्यांपासून आपल्या गावात ज्या काही घटना घडत आहेत त्या खूप भयानक आहेत. त्यानंतर लहान मुले शाळेत जात असल्याचे दिसते, तसेच रक्तपातही पाहायला मिळतो.
पुढे ऐकायला येते की, गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर एक मुलगी पाण्यात बुडताना दिसत आहे. कोणाचातरी मृत्यू होतो. गावात पोलिस येतात. त्यानंतर काही भयावह दृश्ये दिसतात.
चित्रपटात अनिल नगरकर, भारत गणेशपुरे, ओंकार भोजने, रोहित कोकाटे, प्रवीण डाळिंबकर, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, चित्तरंजन गिरी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, त्यांचे लूक या टीझरमध्ये दिसत आहेत.
टीझरच्या शेवटी एक महिला पोलिस अधिकारी दिसते, पण तिचा चेहरा दिसत नाही, त्यामुळे ही भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही.
हा टीझर शेअर करताना सत्य घटनेमागील सत्य-‘सालबर्डी’ असे लिहिले आहे. गूढ रहस्य आणि सत्याचा शोध सुरू होतोय. रमेश चौधरी यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शन केले आहे.
दरम्यान, हा सिनेमा १७ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. आता कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
