भारतीय क्रिकेट संघाने काल (२९ जून) दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. त्यामुळे काल रात्रीपासून भारतात ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मराठी कलाकारांनी देखील खास पोस्ट करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. अशातच लोकप्रिय संगीतकार व गायक सलील कुलकर्णींनी विश्वचषक जिंकल्यानंतर विश्लेषण करत रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह या संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाचं भरभरून कौतुक केलं आहे. टी-२० विश्वचषकाची स्पर्धा सुरू झाल्यापासून सलील कुलकर्णी भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्याचं विश्लेषण करत आले आहेत. त्याप्रमाणे त्यांनी काल भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण अंतिम सामन्याचं विश्लेषण केलं. "क्रिकेटवेड्यांचं अभिनंदन…आपण चॅम्पियन आहोत…मी करत असलेल्या विश्लेषणाच्या व्हिडीओला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद…इंडिया…इंडिया…इंडिया…", असं कॅप्शन लिहित सलील कुलकर्णींनी व्हिडीओ शेअर केला आहे. हेही वाचा - “खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी या व्हिडीओत सलील कुलकर्णी म्हणाले, "नमस्कार, सगळ्या खऱ्या क्रिकेटवेड्यांचं प्रचंड अभिनंदन. आपण विश्वचषक जिंकलो आहोत. विश्वचषक स्पर्धेच्या आपण पहिल्या दिवसापासून गप्पा मारतोय. काय एक-एक सामने झाले…सगळे सामने आपण जिंकतं आलो आणि विश्वचषक जिंकला. रोहित शर्मा, राहुल द्रविड या सगळ्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन. विराट कोहली कालची जी इनिंग खेळला, त्याने परत एकदा दाखवलं, तो का किंग कोहली आहे? मोठ्या स्टेजवर मोठा माणूस गातो, तसा तो काल खेळला. आणि पंड्या म्हणजे आपल्याला खरंतर या दोघांविषयी वाईट वाटायला पाहिजे. ज्या पद्धतीने या दोघांना ट्रोल केलं गेलं किंवा उगीच ती पाच मनिटं सामना पाहिला आणि कोहलीपण बाहेरून बघतो वगैरे. हे ना मोठ्या खेळाडूंविषयी बोलताना विचार करायला पाहिजे. ही खूप मोठी आणि कष्ट केलेली माणसं आहेत. योग्य वेळेला ते दाखवून देतात." पुढे सलील कुलकर्णी म्हणाले, "आज अक्षर पटेलची इनिंग कमाल होती. फार चढ-उतार होते, सुरुवातीला दोन ओव्हर इतक्या छान गेल्या. पण लागोपाठ तीन वीकेड गेल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या पोटात गोळा आला होता. पण त्याच्यानंतर अक्षर पटेल अप्रतिम खेळला आणि मजा आली. स्कोअर छान बनला होता. त्यामुळे वाटत होतं की, आपल्याला उत्तम संधी आहे. पण क्लासेन आणि मिलर खूप मारत होते. डिकॉक मारत होता. पण कालचा सूर्याचा कॅच मला असं वाटतं, ८३च्या कपिल देवच्या कॅच इतकाच आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिल. त्याच्यानंतर पंड्या आणि बुमराह जादूगार आहेत. बुमराह हॅट्स ऑफ… सॅल्यूट. रोहित शर्मा व्ही आर लव्ह यू…पंड्या व्ही आर लव्ह यू… कोहली तू किंग आहेस. इंडिया…इंडिया…इंडिया." हेही वाचा - T20 World Cup : अनुष्काला व्हिडीओ कॉल करताच विराटला अश्रू अनावर! ऐतिहासिक विजयानंतर किंग कोहली झाला भावुक दरम्यान, सलील कुलकर्णींच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. "हे आजकाल जे विश्लेषण चाललंय ते फार आवडतंय", "दादा तुमच्या व्हिडीओची वाट पाहात होते. तुमचं आणि सगळ्या भारतीयांचं खूप खूप अभिनंदन", "आदरणीय सलील सर तुमचे कितीही आभार मानलेत तरी ते कमीच आहे. कारण तुम्ही आम्हा सर्वांना प्रत्येक सामन्यानंतर जी ऊर्जा दिली त्याने खूप आनंद मिळाला. खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद…जय हिंद सर", अशा अनेक प्रतिक्रिया सलील यांच्या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.