लोकप्रिय गायक, गीतकार सलील कुलकर्णी यांनी आजवर त्यांच्या गाण्यांनधून आणि कवितांमधून रसिकांना मंत्रमुग्ध केलंच आहे. ते संदीप खरे यांच्याबरोबर ‘आयुष्यावर बोलू काही’चे अनेक कार्यक्रम करत असतात. त्यांनी टेलिव्हिजन विश्वात रिअॅलिटी शो परिक्षक म्हणूनही ओळख मिळवली आहे. याव्यतिरिक्त ते चित्रपट दिग्दर्शकही आहेत.

सलील कुलकर्णींनी ‘वेडिंगचा सिनेमा’ आणि ‘एकदा काय झालं’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट तर ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा मानकरीही ठरला आहे. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटात वडील आणि मुलाचं नातं अतिशय सुंदररित्या मांडलं आहे.

या चित्रपटामध्ये सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, सुहास जोशी, पुष्कर जोशी, मोहन आगाशे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तो म्हणजे सलील यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाचा तेलुगूमध्ये रिमेक करण्यात आला आहे.

याबद्दल स्वत: सलील यांनी खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी असं म्हटलं, “लेखक, दिग्दर्शक, संगीतकार म्हणून माझ्या ह्रदयाच्या सर्वांत जवळची कलाकृती म्हणजे ‘एकदा काय झालं’. माझ्यामधल्या बाबाने लिहिलेला हा चित्रपट…. या चित्रपटाने मला खूप काही दिले.”

यापुढे सलील कुलकर्णी म्हणतात, “‘एकदा काय झालं’ने काय दिलं… एक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार दिला. दोन म्हणजे स्टॅनफोर्ड विद्यापीठात ‘स्टोरी टेलिंग’ विषयावर बोलण्यासाठी भाषणासाठी आमंत्रण आलं. तसंच ‘रे क्षणा ‘ ‘भीमरूपी’, ‘श्याम राम’ आणि ‘बाळाला झोप का गं येत नाही’सारखी गाणी दिली आणि रसिकांचे उदंड प्रेम दिलं.”

यानंतर ते या पोस्टमध्ये असं म्हणतात, “आता अजून एक आनंद म्हणजे आपल्या या गोष्टीवर तेलुगू चित्रपट तयार होणं आणि रसिकांना तो आवडणं… बाप्पा… ज्या क्षणी ही गोष्ट सुचली त्या क्षणासाठी तुझे धन्यवाद आणि माझ्या सर्व निर्मात्यांना तसंच सहकलाकारांना खूप खूप धन्यवाद आणि प्रेम.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलील कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या पोस्टखाली अभिनेते सुमित राघवन यांनीही “आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे सलील” अशी कमेंट केली आहे. तसंच अनेक चाहत्यांनीही या पोस्टखालील कमेंट्समध्ये सलील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच कौतुकही केलं आहे.