Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : सध्या संपूर्ण देशभरात रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाला असाच भरभरून प्रतिसाद द्या, असं आवाहन रितेशने प्रेक्षकांना केलं आहे. यासह अनेक कलाकार व राजकीय वर्तुळातील दिग्गज मंडळींनी देखील ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहिल्यावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपतींनी नुकताच ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्यांनी रितेशसह जिनिलीया देशमुख यांचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे.
“आज कोल्हापूरमध्ये ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक सिनेमाच्या विशेष शोचे युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अफजलखान वधावर आधारित या चित्रपटात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे, स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजांचे कर्तृत्व आणि राजमाता जिजाऊ मांसाहेबांचे योगदान चित्रपटात योग्यपणे दर्शवले आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अभिनेते रितेश देशमुख यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन! या भव्य चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल जिनिलीया देशमुख यांचेही अभिनंदन!” असं संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
त्यांची ही पोस्ट वाचून रितेशने संभाजीराजे छत्रपतींचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. रितेश लिहितो, “राजे! आपले खूप खूप आभार…आपली प्रतिक्रिया ऐकून माझ्यावरचं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आपले प्रेम आणि आशीर्वाद असंच असू द्या. जय शिवराय!”
दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी या सिनेमाने १२.४० कोटी कमावले. तर, शनिवार-रविवारी अनुक्रमे ११.५० आणि १३.१० कोटींची कमाई केली. या सिनेमाने गेल्या तीन दिवसांत ३७ कोटींचा गल्ला जमावला आहे. आता हा ऐतिहासिक सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
