Sameer Dharmadhikari on Akshaye Khanna:सध्या अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यापैकीच एक म्हणजे रणपती शिवराय स्वारी आग्रा हा आहे. लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या चर्चा होताना दिसत आहे.

रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रने साकारली आहे. तर समीर धर्माधिकारी यांनी औरंगजेब ही भूमिका साकारली आहे.

“जर मला ८० वर्षांच्या औरंगजेबाची भूमिका…”

आता समीर धर्माधिकारी यांनी नुकतीच ‘तारांगणला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अक्षय खन्नाने छावा चित्रपटात साकारलेल्या औरंगजेब या भूमिकेचे कौतुक केले. समीर धर्माधिकारी म्हणाले, “अक्षय खन्नाने औरंगजेब ही भूमिका अप्रतिम साकारली होती. नशिबाची गोष्ट अशी आहे की त्याने ८० वर्षांच्या औरंगजेबाची भूमिका साकारली होती.”

“मी पन्नाशीच्या औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे मी प्रीक्वेलमध्ये आहे. जर मला ८० वर्षांच्या औरंगजेबाची भूमिका साकारायला सांगितली असती तर मी दिग्पालला विनंती केली असती की दुसऱ्या कोणत्यातरी कलाकाराला या भूमिकेसाठी विचार.”

याच मुलाखतीत समीर धर्माधिकारी यांनी दिग्पाल लांजेकर ज्या पद्धतीने स्क्रीप्ट सांगतात, त्याचेदेखील कौतुक केले. शूटिंगचा अनुभव सांगत ते म्हणाले, “शूटिंगचा अनुभव उत्तम होता. तो दरबार खूप सुंदर बनवला होता. शूटिंग करताना दिग्पाल मोकळीक देतो, त्यामुळे मजा येते.”

या मुलाखतीत त्यांना असेही विचारले की कोणते कलाकार तुला खलनायकाच्या भूमिकेत आवडले? त्यावर समीर धर्माधिकारी म्हणाले, “प्राण साहेब, अजित तसेच आता अक्षय खन्नादेखील आवडला. निळू फुले, अशोक सराफ यांनीदेखील खूप खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यासुद्धा आवडल्या. असे अनेक कलाकार आहेत.”

दिग्दर्शन क्षेत्रात यायची इच्छा आहे का? असे विचारल्यानंतर समीर धर्माधिकारी म्हणाले की मी अभिनेता म्हणून आनंदी आहे.

समीर धर्माधिकारी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सत्ता, रेनकोट, अग्नीपंख, रफ्ता रफ्ता-द स्पीड, फर्जंद, फतेशिकस्त, पावनखिंड, वजनदार, जुनं फर्निचर, धर्मवीर २, सुभेदार, शिवरायांचा छावा, शाबास मिठू अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

याबरोबरच, पेशवा बाजीराव, चक्रवर्ती अशोका सम्राट, अशोका, झाँसी की रानी अशा अनेक मालिकांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. समीर धर्माधिकारी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता आगामी काळात समीर धर्माधिकारी कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.