Kranti Redkar & Sameer wankhede : क्रांती रेडकरने दिग्दर्शित केलेला ‘मैत्रेया’ सिनेमा येत्या २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘काकण’च्या यशानंतर क्रांतीची ही नवीन कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. ‘मैत्रेया’च्या ट्रेलर लॉन्चसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने क्रांती व तिचे कुटुंबीय, ‘मैत्रेया’ सिनेमाची संपूर्ण टीम एकत्र आली होती. यादरम्यान, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं क्रांतीच्या जुळ्या मुलींनी. त्यांना प्रेमाने सगळे छबिल-गोदो म्हणतात. त्यांची खरी नावं ‘झिया’ व ‘जायदा’ अशी आहेत.

छबिल-गोदो आपल्या आई-बाबांसह रेड कार्पेटवर आल्या होत्या. या दोघींचे क्युट एक्स्प्रेशन्स, दोघींच्या सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधून केलं. छबिल-गोदोने अगदी प्रेमाने सर्वांना अभिवादन केलं आणि कॅमेरासमोर हसून क्युट पोझ दिल्या. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि छबिल-गोदोचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

याशिवाय समीर वानखेडेंनी सुद्धा ट्रेलर लॉन्चदरम्यान आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, “सगळ्यात आधी सांगतो, मी इथे मिसफिट आहे कारण, मला या क्षेत्रातल्या कोणत्याच गोष्टी समजत नाहीत. मला चित्रपट-गाण्यांमधलं काहीच कळत नाही. पण, इथे मी अर्थात क्रांतीसाठी आलोय. कारण, मराठी इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करून तिने स्वत:ची एक ओळख निर्माण केलीये. त्यामुळे मला कायमच तिचा अभिमान वाटतो. जेव्हा मला विचारलं जातं, सर तुमची शक्ती काय आहे? तुम्हाला पाठिंबा कोण देतं? त्यावेळी मी सगळ्या मुलाखतींमध्येही हेच सांगतो, माझ्या घरातच राणी लक्ष्मीबाई आहेत. घरी क्रांती सगळं सांभाळते म्हणूनच मला बाहेर माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करता येतं.”

“क्रांती म्हणजे काय तर Revolution आणि नावातच रेडकर आहे, म्हणजे Raid कर! त्यामुळे मग मी तेच करतो. माझ्या क्रांतीला मनापासून शुभेच्छा, तू अशीच पुढे जा…मी तुझ्या नेहमीच पाठिशी असेन.” असं म्हणत समीर वानखेडेंनी क्रांतीला ‘मैत्रेया’साठी भरभरून शुभेच्छा दिल्या.