Sandeep Pathak shares Laxmikant Berde Memory : मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवलेले दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके ‘लक्ष्या’ हे आजही सर्वांचे लाडके आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याने २००४ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांना जाऊन जवळपास दोन दशके उलटून गेली आहेत; पण तरी ते आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डे हे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी प्रत्येकाच्याच मनात आहेत. केवळ प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकारही त्यांच्याबद्दलच्या आठवणी व्यक्त करत असतात. आजवर त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक कलाकारांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. अशातच मराठी अभिनेता संदीप पाठकनेसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंचा जुना किस्सा शेअर केला आहे.
संदीप पाठक लवकरच ‘घबाडकुंड’ या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या टीझर लॉंचनिमित्त त्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी आठवण सांगितली. यावेळी संदीप पाठक म्हणाला, “गेली २५ वर्षं मी या इंडस्ट्रीत काम करत आहे. मला माझं गाव सोडून मुंबईत येऊन २५ वर्षं झाली. मालिका, सिनेमा, नाटक यांत काम करत असतानाच प्रसिद्धी मिळतच असते. पण या भूमिका फारच लहान होत्या. एखाद्या सिनेमात मोठी भूमिका करावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ‘घबाडकुंड’ सिनेमामुळे मला ते करता आलं.”
पुढे संदीपनं सांगितलं, मी अनेक सिनेमे केले; पण ‘घबाडकुंड’ सिनेमात माझ्याभोवतीचं काम आहे. यानिमित्तानं लक्ष्मीकांत बेर्डे सरांची खूप आठवण येत आहे. त्याचं कारण असं आहे की, २००१ मध्ये मी ‘सर आली धावून’ या नाटकात त्यांच्याबरोबर काम केलं होतं. मी भूकंपग्रस्त मुलाची भूमिका त्यात केली होती. तेव्हा मी जरा बारीक दिसायचो आणि माझे दातही तेव्हा बाहेर आले होते. तर त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की, मला माझ्या दातांना ब्रेसेस लावायचे आहेत. तर कुणी डेंटिस्ट असेल, तर सांगा… त्यावर ते मला जवळ घेत म्हणालेले की, कधीच मनात हा विचार आणू नकोस आणि आता तुझे दात बाहेर आहेत, तेच पुढे जाऊन तुझी एक ओळख बनतील. तुझ्या याच रूपावर आधारित सिनेमे येतील. तेव्हा तुला माझी नक्की आठवण येईल. त्यांनी बोललेलं ते वाक्य आज खरं होत आहे. त्यामुळे मला त्यांची आठवण येत आहे. त्यांनी तेव्हा खूप मोठा संदेश दिला होता की, तुमचं दिसणं महत्त्वाचं नाही, तर असणं महत्त्वाचं आहे.”
दरम्यान, ‘घबाडकुंड’मध्ये संदीपसह देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरेसारख्या कलाकारांची दमदार फौज आहे.
