मराठी मनोरंजन सृष्टीतील बहुगुणसंपन्न अभिनेत्यांच्या यादीत संदीप पाठक याचं नाव घेतलं जातं. आतापर्यंत त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आज त्याने मनोरंजन सृष्टीत मोठं नाव कमावलं असलं तरीही सुरुवातीच्या काळामध्ये त्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. याबद्दल त्याने नुकतंच भाष्य केलं.
संदीप पाठक जेव्हा करिअर करण्यासाठी मुंबईत आला तेव्हा त्याला अनेक वाईट अनुभव आले. सेटवर देखील त्याला इतर नव्या कलाकारांप्रमाणेच अपमानास्पद वागणूक मिळायची. या त्याच्या स्ट्रगलच्या दिवसातल्या आठवणी त्याने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितल्या.
आणखी वाचा : बिरबलाच्या भूमिकेतील फर्स्ट लूकमुळे सुबोध भावे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अरे देवा…”
संदीपने नुकतीच ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. तेव्हा त्याला “सेटवर कधी अपमानास्पद वागणूक मिळाली आहे का?” असं विचारण्यात आलं. याचं उत्तर देताना तो म्हणाला, “अर्थात, ती मिळायलाच हवी. अहो गरजेची असते ती. तुम्ही मोठं होण्यासाठी ती फार गरजेची असते. सुरुवातीच्या काळात, बसायला खुर्चीही न मिळणे, चहा दहा वेळा मागितल्यानंतर तोंडावर चहा फेकून मारणे, असे बरेच किस्से आहे. पैसे मागायला गेलो हमखास अशी वागणूक मिळायची. सिरीयलचा निर्माता कुणी हिंदीवाला असतो. आपले राहिलेले असतात १२०० रुपये आणि १५०० रुपये पर डे प्रमाणे पाच ते सहा हजार आणि ते आपण मागायला आत गेल्यावर त्यांचाच नोकर येऊन म्हणतो, ए चलो उठो, उठो, बाहर बैठो चलो. असं अनेकदा झालेलं आहे.”
हेही वाचा : “मला आज एका मुलाखतीत नकार देण्यात आला कारण…” संदीप पाठकचा व्हिडीओ व्हायरल
संदीप 22 वर्षांपूर्वी मराठवाड्यातून मुंबईत काम करण्याच्या निमित्ताने आला. त्याने अनेक नाटकं, मालिका, चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत काम करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. पण आता संदीपचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.