मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका मांडत आहेत. चित्रपटात त्यांचा जीवनपट केंद्रस्थानी आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी आग्रही भूमिका, आरक्षणावरील आक्षेप, विरोध असा संघर्षही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : शिवानी सुर्वेच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत झळकणार ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेता, साकारणार ‘ही’ भूमिका

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा’ – मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडली जाणार आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.

‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील याच्यासह संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा : “झोपेत असताना गोळीबाराचा आवाज आला अन्…”, सलमान खानने पहिल्यांदाच पोलिसांना सांगितला ‘त्या’ दिवशीचा घटनाक्रम

‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा पहिला टीझर, ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहेत. सध्या सोशल मीडियावर ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशा या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास येत्या १४ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.